भाजप व राष्ट्रीय स्वयंसेवक संघ हे हिंदू दहशतवाद्यांच्या प्रशिक्षण छावण्या चालवतात, असे खळबळजनक विधान केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी केले असून त्यावर सोनिया गांधी यांनी आता माफी मागावी, अशी मागणी करीत हिंदुत्ववादी पक्षांनी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. गृहमंत्र्यांच्या विधानावरून आता भाजप व काँग्रेस यांच्यात चांगलीच जुंपली आहे
एकीकडे आपण देशात शांतता नांदावी यासाठी प्रयत्न करतो. अल्पसंख्याकांवरील अन्यायाविरोधात पावले उचलतो, घुसखोरी रोखण्याचे प्रयत्न करतो, पण दुसरीकडे रा. स्व. संघ व भाजप हे हिंदू दहशतवाद पसरवीत असल्याचा अहवाल आपल्याला प्राप्त झाला आहे. त्यावर आम्ही कडक लक्ष ठेवत आहोत, असे शिंदे यांनी अखिल भारतीय काँग्रेस समितीच्या अधिवेशनात सांगितले. समझौता एक्सप्रेस, मक्का मशीद येथे बॉम्ब ठेवले जातात. मालेगावात बॉम्बस्फोट केले जातात, या सगळ्या घटनांत उजव्या विचारसरणीच्या अतिरेकी गटांचा हात असल्याचा दाट संशय आहे, असे सांगून ते म्हणाले, की आम्हाला याचा गांभीर्याने विचार करावा लागेल व सतर्कही राहावे लागेल.
संतप्त प्रतिक्रिया
भाजपचे प्रवक्ते मुख्तार अब्बास नक्वी यांनी दिल्ली येथे शिंदे यांच्यावर टीकेची झोड उठवली ते म्हणाले, की काँग्रेसची मनोवृत्ती ही विध्वंसक आहे हेच गृहमंत्र्यांच्या विधानातून दिसून येते. चिंतन शिबिरात त्यांनी केलेले वक्तव्य आक्षेपार्ह व धोकादायक आहे. आम्ही ही वक्तव्ये सहन करणार नाही. रा. स्व. संघाचे प्रवक्ते राम माधव यांनी सांगितले, की जर एखाद्या काँग्रेस नेत्याने असे वक्तव्य केले असते तर वेगळी गोष्ट आहे, पण गृहमंत्रीच अशी  वक्तव्ये करीत असतील, तर ते गंभीर आहे
पाठराखण
शिंदे यांना उजव्या गटांचा दहशतवाद असे म्हणायचे होते. हिंदू किंवा मुस्लीम दहशतवाद असे काही नसते असे सांगत काँग्रेस नेते राजीव शुक्ला यांनी शिंदे यांची पाठराखण केली. तर शिंदे यांनी, आपण भगव्या दहशतवादाबद्दल बोललो व त्यात नवीन काही नाही. ते प्रसारमाध्यमातही अनेकदा आले आहे, असे सांगत आपल्या विधानाचा पुनरुच्चार केला.