महात्मा गांधी व रवींद्रनाथ टागोर यांच्यासह स्वातंत्र्यसंग्रामात आघाडीवर असलेल्या नेत्यांचे शिक्षण ‘पाश्चिमात्य’ पद्धतीने झाले, मात्र तिचा विपरीत प्रभाव कधी त्यांच्यावर प्रभाव पडला नाही, असे रा.स्व. संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी शनिवारी सांगितले.

केवळ पाश्चिमात्य पद्धतीचे शिक्षण ही एकमेव शिक्षणप्रणाली नसून, मुलाचे पालक, तसेच त्याच्या घरातील आणि समाजातील वातावरण हेही त्याच्या संगोपनात महत्त्वाची भूमिका बजावतात, यावर भागवत यांचा भर होता. संघ परिवारातील अनेक संघटनांनी शिक्षणाच्या ‘पाश्चिमात्यीकरणाविरुद्ध’ आवाज उठवला असून, शिक्षण व्यवस्थेत आमूलाग्र सुधारणांची मागणी केलेली आहे. शिक्षण व्यवस्था बदलणे आवश्यक असल्याबाबत ‘समाजात एकमत आहे’, असे सांगून भागवत म्हणाले की, आपण जी परदेशी शिक्षण पद्धत असल्याचे म्हणतो, त्या मॅकॉले शिक्षण पद्धतीने विवेकानंद, लोकमान्य टिळक, गांधीजी व रवींद्रनाथ टागोर यांच्यासारखे नेते दिले. मग त्या शिक्षणव्यवस्थेने त्यांच्यावर का प्रभाव टाकला नाही? स्वातंत्र्यसंग्रामात सहभागी झालेली संपूर्ण पिढी मॅकॉले शिक्षण पद्धतीतच शिकली, याकडे त्यांनी लक्ष वेधले. अहमदाबाद येथील पुनरुत्थान विद्यापीठाने प्रकाशित केलेल्या ‘भारतीय शिक्षा ग्रंथमालेच्या’ विमोचन प्रसंगी डॉ. भागवत यांनी हे विचार व्यक्त केले.