पल्लकडच्या जिल्हाधिकाऱ्यांच्या निवेदनामुळे सरसंघचालक मोहन भागवत यांना स्वातंत्र्यदिनानिमित्त केरळमधील शाळेत ध्वजारोहणापासून रोखण्यात आले होते. मात्र, शाळा प्रशासनाच्या मध्यस्थीने अखेर सरसंघचालक मोहन भागवत यांनी ध्वजारोहण केले.


सरकारी शाळेमध्ये एखाद्या राजकीय नेत्याच्या हस्ते ध्वजारोहण करणे योग्य नाही. त्याऐवजी शाळेतील शिक्षक किंवा एखाद्या लोकप्रतिनिधीने ध्वजारोहण करायला हवे असे पल्लकडच्या जिल्हाधिकाऱ्यांनी करनाकियामन शाळेला पाठवलेल्या निवेदनात म्हटले होते. त्यानुसार भागवत यांना ध्वजारोहणापासून रोखण्यात आले होते. मात्र, शाळेचे यंदा सुवर्णमहोत्सवी वर्ष असल्याने भागवतांच्या हस्ते होणारा ध्वजारोहणाचा कार्यक्रम एक वर्षांपूर्वीच ठरल्याचे शाळा प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

मात्र, या प्रकारामुळे येथे उपस्थित भाजपच्या कार्यकर्त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांच्या या भुमिकेला विरोध करीत भागवत हेच ध्वजारोहण करतील अशी भुमिका घेतली होती. शाळा प्रशासनाने या कार्यक्रमाचे निमंत्रण दिल्याने त्यांनीच याबाबत निर्णय घेणे आवश्यक असल्याची भाजपचे म्हणणे होते.

गेल्या अनेक वर्षांपासून केरळमध्ये भाजप आणि रा. स्व. संघ आपले बस्तान बसवण्यासाठी प्रयत्न करीत आहेत. या दरम्यान, अनेकदा संघ आणि डाव्यांमध्ये संघर्ष पहायला मिळाला आहे. अलिकडेच केरळमध्ये या दोन्हींच्या कार्यकर्त्यांमध्ये हिंसक घटना घडल्या होत्या.

दरम्यान, सन २००२ मध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने पहिल्यांदा आपल्या नागपूर येथील मुख्यालयावर राष्ट्रध्वज फडकावला होता.