आगामी काळात देशात आणीबाणीची शक्यता नाकारता येणार नाही, या लालकृष्ण अडवाणी यांच्या धक्कादायक विधानाशी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने असहमती दर्शविली.
या संदर्भात प्रतिक्रिया देताना संघाचे नेते मा. गो. वैद्य म्हणाले, इंदिरा गांधी यांनी ज्या प्रमाणे स्वतःची खुर्ची वाचविण्यासाठी देशात आणीबाणी लागू केली होती. तसे पुढील काळात कोणी करेल, असे मला वाटत नाही. त्याचबरोबर लालकृष्ण अडवाणी हे भाजपमधील ज्येष्ठ नेते आहेत. पक्षाच्या मार्गदर्शक मंडळाचे ते सदस्य आहेत. आणीबाणीसंदर्भात वक्तव्य करून ते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर निशाणा साधत आहेत, असेही मला वाटत नाही. वयाने आणि अनुभवानेही ते मोदींपेक्षा ज्येष्ठ आहेत. त्यामुळे त्यांना जर काही वाटत असेल, तर ते थेटपणे मोदींशीच बोलतील, अशा पद्धतीने वक्तव्य करणार नाहीत, असे वैद्य यांनी म्हटले आहे.
सध्या देशात घटनेला आणि मुलभूत कायदेशीर हक्कांना धरून नसलेल्या शक्ती प्रबळ होताना दिसत आहेत. या शक्ती लोकशाहीला चिरडू शकतात. त्यामुळे आगामी काळात देशात आणीबाणीची शक्यता नाकारता येत नसल्याचे धक्कादायक विधान अडवाणी यानी ‘द इंडियन एक्स्प्रेस’ला दिलेल्या विशेष मुलाखतीत केले होते.