अठरावाच्या शतकातील म्हैसूरचा सत्ताधीश टिपू सुलतानची जयंती साजरी करण्यावरून कर्नाटकात निर्माण झालेला वाद शमण्याची चिन्हे दिसत नाहीत. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे(आरएसएस) मुखपत्र असलेल्या ‘पांचजन्य’ साप्ताहिकात टिपू सुलतानला दक्षिण भारताचा औरंगजेब संबोधण्यात आले आहे.

साप्ताहिकात प्रकाशित करण्यात आलेल्या एका लेखात टिपू सुलतानची जयंती साजरी करण्याच्या कर्नाटक सरकारच्या निर्णयावर ताशेरे ओढत केवळ मुस्लिमांच्या समाधानासाठी कर्नाटक सरकार हा खटाटोप करत असल्याचे नमूद करण्यात आले आहे.

हिंदु संघटनांना टिपू सुलतान धर्मनिरपेक्ष होता असे वाटत नाही. तो असहिष्णू आणि अत्याचारी शासक होता. त्याने अनेकांना बळजबरी मुस्लीम धर्म स्विकारण्यास भाग पाडले होते. तसेच अनेक मंदिरं उध्वस्त करण्यासही तो जबाबदार होता. तो दक्षिण भारताचा औरंगजेबच होता, असे ‘पांचजन्य’मधील लेखात लिहीले आहे.

टिपू सुलतानच्या जयंतीच्या मुद्द्यावर कर्नाटकातील वातारवण ढवळून निघाले आहे. सरकारच्या निर्णयाविरोधात आंदोलन करताना विश्व हिंदू परिषदेचा (विहिंप) स्थानिक कार्यकर्ता ठार झाला होता. त्यानंतर आंदोलनाला तीव्र स्वरूप प्राप्त झाले असून मागील आठवड्यात विंहिपच्या कार्यकर्त्यांनी राज्यभर रास्ता रोको आंदोलन केले.  आता ‘पांचजन्य’मधील लेखाच्या माध्यमातून स्वयंसेवक संघाने कर्नाटक सरकार आणि मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्यावर हल्ला चढवला आहे. कर्नाटक सरकारविरोधातील हे आंदोलन अधिक तीव्र होत गेल्यास जयंती साजरी करण्याचा हा वादग्रस्त मुद्दा येत्या काळात सरकारसमोरील मोठी अडचण ठरण्याची दाट शक्यता आहे.

सिद्धरामय्या यांनी केवळ आपल्या राजकीय फायद्यासाठी टिपू सुलतानची जयंती साजरी करण्याचा निर्णय घेतला असून  सिद्धरामय्या हे कर्नाटकातील लालूप्रसाद असल्याचे लेखात म्हटले आहे.