देशाची सत्ता हातात येईपर्यंत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या नेत्यांनी कधीही तिरंग्याला वंदन केले नव्हते, असा आरोप काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी केला. ते गुरूवारी दिल्लीत आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात बोलत होते. यावेळी राहुल गांधी यांनी संघावर अक्षरश: आगपाखड केली. सत्ता आहे तोपर्यंतच संघातील लोकांची देशाशी बांधिलकी आहे. देशाकडे बघण्याचे दोन दृष्टीकोन आहेत. एक दृष्टीकोन सांगतो की, हा देश माझा आहे. तर दुसरा दृष्टीकोन असतो की, मी या देशाचा आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि काँग्रेसमध्ये हाच मुलभूत फरक आहे. हा देश आमचा आहे, तुम्ही या देशाचे नाहीत, ही संघाची विचारसरणी आहे. गुजरातमध्ये दलितांना मारहाण करून संघाने हे दाखवून दिले आहे, असे राहुल गांधी यांनी सांगितले. आपल्या विचारसरणीने देशातील निवडणुका जिंकता येणार नाहीत, हे संघाला ठाऊक आहे. त्यामुळे ते देशातील महत्त्वपूर्ण संस्थेत आपल्या माणसांची वर्णी लावत आहेत. तसेच संघाला देशाची घटना बदलून टाकायची आहे, असा आरोपही राहुल यांनी केला.

आजच्या भाषणात राहुल यांनी पुन्हा एकदा मोदी सरकारच्या धोरणांवरही टीका केली. देशातील शेतकरी आक्रोश करतोय; हा देश शेतकऱ्यांचा राहिला नाही, हा देश फक्त १५-२० उद्योगपतींचा झाला आहे. अरूण जेटली लोकसभेत कर्जमाफी आमच्या धोरणात बसत नसल्याचे सांगतात. त्यामुळे शेतकरी मेले तरी यांना फरक पडणार नाही. मोदी सतत ‘मेक इन इंडिया’चा नारा देत असतात. बाजारपेठेत मात्र चिनी बनावटीच्या वस्तूच पाहायला मिळतात. यावरून एकच सिद्ध होते की, मोदींचे ‘मेक इन इंडिया’ धोरण पुरते फसले आहे. जिथं जातात तिथं खोटं बोलतात, हेच मोदींचे धोरण असल्याची टीकाही राहुल गांधी यांनी केली.