राष्ट्रीय स्वयंसेवक संघ व बजरंग दल यांच्या पुढाकाराने आग्रा येथे २०० मुस्लिमांचे धर्मातरण करण्याच्या उपक्रमाने विरोधकांचा तिळपापड झाला असतानाच अधिकाधिक मुस्लिम व ख्रिश्चनांना पुन्हा हिंदू धर्मात प्रवेश देण्याचा संघाचा अजेंडा असल्याचे स्पष्ट झाले आहे. धर्मातरणाच्या या ‘घर वापसी’ अभियानाला संघातील वरिष्ठांचा आशीर्वाद असून त्यासाठी खास ५८ प्रचारकांची नियुक्ती करण्यात आली आहे. पुढील जनगणनेत हिंदूंची संख्या वाढावी हाच या अभियनामागील उद्देश असल्याचे सूत्रांनी सांगितले.
ज्यांचे पूर्वज हिंदू होते, मात्र काही कारणास्तव ज्यांनी मुस्लिम वा ख्रिश्चन धर्म स्वीकारला अशांना पुन्हा हिंदू धर्मात प्रवेश देण्याचे अभियान संघाने चालवले आहे. या अभियानाचे फलीत म्हणून गेल्या पाच वर्षांत ५० हजार जणांनी धर्मपरिवर्तन केले. त्यांना पुढील वर्षी ऑगस्टमध्ये नाशिक येथे होणाऱ्या कुंभमेळ्यात उपस्थित केले जाऊन साधुसंतांचे आशीर्वाद दिले जाणार आहेत. मुस्लिम व ख्रिश्चनांच्या या धर्मपरिवर्तनाच्या ‘घर वापसी’ अभियानाला अधिक बळकटी देण्याचा निर्णय नुकताच नागपुरातील संघाच्या अधिवेशनात झाला. संघाच्या ‘धर्म जागरण’ समितीतील १२०० सदस्य या अधिवेशनाला उपस्थित होते. ७ ते ९ नोव्हेंबर या कालावधीत झालेल्या या अधिवेशनाला सरसंघचालक मोहन भागवत, सरकार्यवाह भय्याजी जोशी व सहसरकार्यवाह कृष्ण गोपाळ यांचे मार्गदर्शन लाभले. ‘घर वापसी’ अभियानाला अधिक वेग देण्याचा निर्णय या अधिवेशनात झाल्याचे समजते. या आठवडय़ाच्या अखेरीस बिहारमधील वैशाली येथे ‘हिंदू धर्मापुढील आव्हाने’ या विषयावर चर्चा आयोजित करण्यात आली असून त्यास दोन हजार साधूसंत उपस्थित राहणार असल्याचे बिहार व झारखंडचे प्रभारी सुभेदारसिंह यांनी सांगितले. मुस्लिम व ख्रिश्चनांच्या ‘घर वापसी’ला धर्मातरण हा शब्दप्रयोग करणे चुकीचे असून ते स्वेच्छेने हिंदू धर्मात प्रवेश करत असून त्यांना कोणतेही आमिष दाखवले जात नसल्याचे सुभेदारसिंह यांनी स्पष्ट केले.
दरम्यान, हिंदू धर्मात प्रवेश केलेल्यांना सामावून घेण्यासाठी संघाने २०० विशिष्ट जातींची निवड केली आहे. त्यासाठी त्या त्या जातींच्या नेत्यांनाही राजी करण्यात आले आहे. तडवी भिल, बंजारा, राजपूत, ब्राह्मण, यादव, संथाल, थारू, मीणा, मिओ व नात या जातींमध्ये ‘घर वापसी’ केलेल्या मुस्लिम व ख्रिश्चनांना सामावून घेण्यात आले आहे.