राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी संबंधित मुस्लिम राष्ट्रीय मंचाचे संमेलन अजमेरमध्ये सुरू आहे. संमेलनादरम्यान मुसलमान स्त्रियांना छोट्या कुटुंबाचे महत्व पटवून देत कुटुंब छोटे ठेवण्याचे आवाहन केले. या कार्यक्रमादरम्यान गुरुवारी ज्या सात प्रस्तावांना मान्यता देण्यात आली, त्यातील दोन प्रस्ताव हे असहिष्णुता आणि दहशतवादाशी संबंधित होते. याशिवाय वुमन वेलफेअर फंडाबाबतदेखील घोषणा करण्यात आली. संघाचे नेते इंद्रेश कुमार यांनी संमेलनाची धुरा सांभाळली.

काही नेतेमंडळी जास्त मुलांना जन्म देण्याचा सल्ला देतात, यामुळे केवळ नेत्यांच्या वोट बँकेत वाढ होते. प्रत्यक्षात त्या कुटुंबावर याचा वाईट परिणाम होत असल्याचे सांगत, मुलांना चांगले शिक्षण देता येईल आणि त्यांचे चांगले संगोपन करता येईल इतकीच मुले कुटुंबात असावीत, असा सल्ला इंद्रेश कुमार यांनी संमेलनादरम्यान दिला. त्याचप्रमाणे मुसलमानांच्या उन्नती आणि भरभराटीसाठी मुलींना शिक्षित करणे अतिशय गरजेचे असल्याचे ते म्हणाले. मुसलमान समाजातील मुलींच्या उच्च शिक्षणासाठी पाच लाख रुपयाचा वुमन वेल्फेअर फंड सुरू केल्याची घोषणा त्यांनी यावेळी केली. या फंडाद्वारे मुसलमान मुलींच्या शिक्षणावर सर्वोतोपरी खर्च करण्यात येईल, ज्यायोगे त्यांना मधेच शिक्षण सोडावे लागणार नाही.

देशातील जास्त लोकसंख्येमुळे देशात उपलब्ध असलेल्या साधनांचे वाटप योग्यप्रकारे होत नसल्याचे मत मुस्लिम राष्‍ट्रीय मंचाचे राष्ट्रीय संयोजक मोहम्मद अफजल यांनी व्यक्त केले. यामुळे देशाची प्रगती योग्यप्रकारे होत नसल्याचेदेखील ते म्हणाले. मोहम्मद पैगंबरांनीदेखील सर्वांसाठी उत्तम शिक्षण आवश्यक असल्याचे म्हटल असल्याचे सांगत, छोट्या कुटुंबामुळे मुलांना चांगले शिक्षण आणि नोकरी मिळू शकते, अशी भावना त्यांनी व्यक्त केली.