भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांचे चिरंजीव जय शहा यांच्या कंपनीला गेल्या वर्षात आलेल्या ‘अच्छे दिना’चा मुद्दा सध्या देशभरात गाजतोय. पार्टी विथ डिफरन्स म्हणवून घेणाऱ्या भाजपच्या अध्यक्षांवरच विरोधकांनी थेट हल्ला चढवल्यामुळे सत्ताधारी पक्ष अडचणीत सापडलाय. याच पार्श्वभूमीवर राष्ट्रीय स्वयंसेवक संघ अमित शहांच्या मदतीला धावून आलाय.

कोणावरही आरोप करण्यासाठी त्याचे पुरावे दिले पाहिजेत. कोणत्याही व्यक्तीविरूद्ध भ्रष्टाचाराचे आरोप असतील, तर त्याची चौकशी व्हायला हवी. पण अशी चौकशी करण्यापूर्वी संबंधित आरोप कशाच्या आधारावर केले जात आहेत, त्याचे पुरावेही आरोप करणाऱ्याने दिले पाहिजेत, असे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरकार्यवाह दत्तात्रय होसाबळे यांनी म्हटले आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची बैठक गुरुवारी भोपाळमध्ये होते आहे. या बैठकीच्या पार्श्वभूमीवर होसाबळे यांनी भूमिका मांडली.

या प्रकरणात जय शहा यांच्याविरुद्ध खटला दाखल केला जायला हवा का, असा प्रश्न पत्रकारांनी विचारल्यावर त्याला उत्तर देताना होसाबळे म्हणाले, ज्यांनी आरोप केले आहेत. त्यांनीच पुरावे देऊन ते खरे असल्याचे दाखवून दिले पाहिजे.

दरम्यान, काही दिवसांपूर्वीच केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी या प्रकरणात करण्यात आलेले सर्व आरोप बिनबुडाचे असून, त्याची चौकशी करण्याची काहीही गरज नसल्याचे म्हटले होते. सन २०१४ मध्ये भाजपच्या नेतृत्त्वाखालील सरकार सत्तेत आल्यानंतर अमित शहा यांचे पुत्र जय शहा यांच्या व्यवसायात मोठी वाढ झाली. गेल्या वर्षीच्या तुलनेत त्यांच्या कंपनीच्या वार्षिक उलाढालीत १६००० पटींनी वाढ झाली, असा आरोप काँग्रेस नेते कपिल सिब्बल यांनी केला. त्यानंतर या प्रकरणी प्रचंड राजकीय धुराळा उडाला. काँग्रेसने या प्रकरणाच्या चौकशीची मागणी करीत पक्षाध्यक्ष अमित शहा यांच्या राजीनाम्याचीही मागणी केली.