देशाच्या राष्ट्रपतींच्या सुरक्षेवर गेल्या चार वर्षांमध्ये सुमारे १५५. ४ कोटी रुपये खर्च करण्यात आले आहेत. माहितीच्या अधिकाराअंतर्गत राष्ट्रपती भवनाच्या पोलीस उपायुक्तांनी ही माहिती दिली असून राष्ट्रपतींच्या सुरक्षेाठी एकूण किती जवानांना नेमण्यात आले आहे याचे उत्तर मात्र देण्यात आलेले नाही.

लखनऊ येथील माहिती अधिकार कार्यकर्त्या नूतन ठाकूर यांनी राष्ट्रपतींच्या सुरक्षेवर होणाऱ्या खर्चाविषयी जाणून घेण्यासाठी माहितीच्या अधिकाराअंतर्गत माहिती मागवली होती. राष्ट्रपती भवनातील पोलीस उपायुक्त कार्यालयातर्फे ठाकूर यांना माहिती देण्यात आली आहे. यानुसार २०१४-१५ या आर्थिक वर्षात राष्ट्रपतींच्या सुरक्षेसाठी तैनात करण्यात आलेल्या जवानांचा वेतन खर्च ३८.१७ कोटी रुपयांपर्यंत होता. तर, २०१५-१६ या आर्थिक वर्षात हा खर्च ४१.७७ कोटी रुपयांवर पोहोचला. २०१६-१७ मध्ये राष्ट्रपतींच्या सुरक्षा व्यवस्थेवर ४८.३५ कोटी आणि २०१७-१८ म्हणजेच, चालू वर्षात आतापर्यंत हा खर्च २७.११ कोटी रुपयांवर पोहोचला आहे.

वाचा : अंमली पदार्थाचा अल्पवयीन मुलांना विळखा

राष्ट्रपतींच्या सुरक्षा व्यवस्थेत वाहनांनाही महत्त्व असते. विविध प्रकारच्या बुलेटप्रूफ वाहनांच्या देखभाल-दुरुस्तीसाठी तब्बल ६४.९ लाख रुपये खर्च करण्यात आला आहे. ज्यामध्ये मागील काही आर्थिक वर्षांचा आढावा घेतला तर या खर्चाची आकडेवारी समोर आली आहे. वाहनांच्या देखभाल दुरुस्तीवर २०१४-१५ मध्ये १५.५ लाख रुपये, २०१५-१६ मध्ये २० लाख रुपये, २०१६-१७ मध्ये २१.८ लाख आणि चालू वर्षात म्हणजेच, २०१७-१८ मध्ये आतापर्यंत ७.५ लाख रुपये खर्च करण्यात आले आहेत. या सर्व खर्चामध्ये वाहनांच्या इंधनाचा खर्च वगळण्यात आला आहे. गुप्तता आणि सुरक्षेची कारणं देत राष्ट्रपतींच्या सुरक्षेाठी एकूण किती संख्येने सुरक्षा रक्षक तैनात करण्यात आले आहेत याचे उत्तर देण्यात आलेले नाही.