सत्तर वर्षे वयाच्या एका माहिती अधिकाऱ्याची गोळ्या घालून हत्या करण्यात आल्याची घटना सोमवारी घडली. मंगत त्यागी असे त्यांचे नाव असून त्यांच्या हत्या प्रकरणी विशेष कारवाई दल स्थापन करण्यात आले असून त्यांच्या कुटुंबीयांना संरक्षण देण्यात आले आहे.
मंगत यांनी एकूण १४ हजार माहिती अधिकार अर्ज दाखल करून सरकारी खात्यांमधील भ्रष्टाचार उघड केला होता. मोटारीतून आलेल्या तीन हल्लेखोरांनी ते बखंडा खेडय़ातील त्यांच्या निवासस्थानाबाहेर उभे असताना १४ एप्रिल रोजी त्यांच्यावर गोळ्या झाडल्या.
हापूरचे जिल्हा दंडाधिकारी राजेशकुमार सिंग यांनी सांगितले, की त्यागी यांच्या कुटुंबीयांना चोवीस तास संरक्षण देण्याचा निर्णय घेण्यात आला असून आजपासून त्यांच्या निवासस्थानाबाहेर दोन पोलिस ठेवण्यात येतील. आम्ही विशेष कारवाई दल स्थापन केले असून त्याचे काम लवकरच सुरू होईल व आरोपींना अटक केली जाईल.
पोलिस सूत्रांनी सांगितले, की या प्रकरणी काही धागेदोरे मिळाले आहेत. त्यामुळे या हत्येच्या प्रकरणाचा उलगडा लवकरच होईल अशा विश्वास वाटतो. त्यागी यांनी कुठल्या भ्रष्ट अधिकाऱ्यांविरोधात माहिती अधिकारात अर्ज केले होते याचीही माहिती घेतली जात आहे, त्यावरूनही काही धागेदोरे मिळण्याची शक्यता आहे.