काँग्रेसच्या कार्यकाळात दिवंगत पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ शासकीय कार्यक्रमांनी भरगच्च असलेला ३१ ऑक्टोबरचा ‘हुतात्मा दिन’ आता लोहपुरुष सरदार पटेल यांच्या जयंतीनिमित्त ‘राष्ट्रीय एकता दिवस’ म्हणून साजरा होणार आहे.
रायसिना हिल्सपासून इंडिया गेटपर्यंत विस्तारलेल्या परिसरात सरदार पटेल यांच्या जयंतीनिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत ‘रन फॉर युनिटी’चे आयोजन करण्यात आले आहे.    ‘रन फॉर युनिटी’साठी शास्त्री भवन, कृषी भवन, उद्योग भवन व रेल भवनासह प्रमुख मंत्रालये गुरुवारी दुपारी २ वाजेनंतर बंद करण्यात आली. राष्ट्रपती भवनाच्या पाश्र्वभूमीवर भव्य व्यासपीठ उभारण्यात आले आहे. सकाळी सात वाजता ‘रन फॉर युनिटी’स प्रारंभ होईल. दिल्लीतील दहा हजार नागरिक यामध्ये सहभागी होण्याची शक्यता आहे. ज्यात केंद्रीय मंत्री, दिल्लीतील खासदार, आमदार तसेच विविध स्तरांतील प्रतिष्ठित नागरिक, विद्यार्थ्यांचा समावेश आहे.दिल्लीसह देशभरात जिल्हा स्तरावर अशा प्रकारच्या कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. विशेष म्हणजे सलग दहा वर्षे दिवंगत पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जात असे.