अध्यक्ष ओबामा यांचा खळबळजनक आरोप

अमेरिकेतील निवडणुकीत रशिया हस्तक्षेप करीत असल्याची शक्यता आहे, किंबहुना डेमोक्रॅटिक राष्ट्रीय समितीच्या ईमेलमधील जी माहिती बाहेर फुटली ती रशियन हॅकर्सनीच फोडली, असा खळबळजनक आरोप अमेरिकेचे अध्यक्ष बराक ओबामा यांनी केला आहे. ते म्हणाले, की रशियन लोक आमच्या संगणक व्यवस्था हॅक करतात, केवळ सरकारीच नव्हे तर खासगी संगणक यंत्रणाही हॅक केल्या जातात, असे दिसून आले आहे. यामागचे हेतू मी थेट सांगू शकत नाही.

ट्रम्प यांची पुतिन स्तुती

एनबीसी न्यूजला दिलेल्या मुलाखतीत ओबामा यांनी सांगितले, की डोनाल्ड ट्रम्प यांनी व्लादिमीर पुतिन यांची अनेकदा जाहीर स्तुती केली आहे. पुतिन यांना अमेरिकेच्या अध्यक्षपदी ट्रम्प हवे आहेत असे वाटते का, या सूचक प्रश्नावर त्यांनी वरील उत्तर दिले आहे. ट्रम्प यांनी स्वत:ही रशियात आपल्याला पाठिंबा आहे व रशियात त्यांना प्रसारमाध्यमातही चांगले स्थान मिळत आहे असे ओबामा म्हणाले. रशिया अमेरिकेतील निवडणुकीत प्रभाव टाकीत आहे का असे विचारले असता त्यांनी सांगितले, की काहीही शक्य आहे. डेमोक्रॅटिक राष्ट्रीय समितीचे ईमेल बेकायदेशीररीत्या हॅक करण्यात आले. विकिलिक्सने ते जाहीर केले. पक्षाच्या नेतृत्वाने प्राथमिक लढतीत क्लिंटन यांना पाठिंबा दिला व सिनेटर बर्नी सँडर्स यांना वाऱ्यावर सोडले.

आणखी ईमेल फुटण्याचा धोका

दरम्यान, डेमोक्रॅटिक पक्ष व क्लिंटन यांच्या प्रचार मोहिमेतील प्रमुखांनी असे सांगितले आहे, की डेमोक्रॅटिक पक्षाच्या उमेदवार हिलरी क्लिंटन यांना बरीच हानी होईल असे अनेक ईमेल यापुढेही जाहीर होण्याची शक्यता आहे. हिलरी फॉर अमेरिकेच्या संपर्क संचालक जेनीफर पामिएरी यांनी सांगितले, की विकिलिक्सने जे मेल फोडले आहेत त्यात डेमोक्रॅटिक पक्षाला अडचणीत आणण्याचा विचार होता, पण आमचे नुकसान झाले असे वाटत नाही. यामागे रशियाचा हात आहे एवढेच आम्हाला लोकांना सांगायचे आहे. असे ईमेल केव्हा फुटतात व ते नेमके विशिष्ट वेळीच माहिती बाहेर फोडतात यामागचा अर्थ लोकांनी लक्षात घेणे आवश्यक आहे.

आणखी भांडाफोड करणार- असांज

सीएनएनला दिलेल्या मुलाखतीत विकिलिक्सचा संस्थापक ज्युलियन असांज याने सांगितले, की येत्या काही आठवडय़ांत आम्ही ईमेलमधील माहिती जगजाहीर करून भांडाफोड करणार आहोत. हिलरी क्लिंटन यांच्या प्रचार मोहिमेत कपोलकल्पित आरोप करण्यात आले ते हॅकिंगबाबत होते, पण आम्ही पुढचा धक्का देणार आहोत. देशांतर्गत राजकीय अडचणी आल्या, की क्लिंटन व त्यांचे लोक रशिया व चीनवर आरोप करून मोकळे होतात असा आजवरचा अनुभव आहे.