फिनलॅण्डपाठोपाठ आता रशियामध्येही चाकू हल्ल्याची घटना घडली आहे. रशियातील सूरगूत येथे एका तरुणाने केलेल्या चाकू हल्ल्यात सात जण जखमी झाले आहेत. पोलिसांनी हल्लेखोराचा खात्मा केला असून जखमींपैकी दोघांची प्रकृती गंभीर आहे. हल्लेखोराविषयी अद्याप अधिक माहिती मिळू शकलेली नाही.

सूरगूत शहरातील मुख्य रस्त्यावर शनिवारी २३ वर्षाच्या तरुणाने पादचाऱ्यांवर चाकूने हल्ला केला. या हल्ल्यात सात जण जखमी झाले. या हल्ल्याची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांच्या कारवाईत हल्लेखोराचा मृत्यू झाला. हल्लेखोराची ओळख पटली असून तो मूळचा सायबेरियाचा आहे. हल्लेखोर हा मानसिक रुग्ण असल्याचे स्थानिक प्रसारमाध्यमांनी म्हटले आहे. मात्र या वृत्ताला पोलिसांनी अद्याप दुजोरा दिलेला नाही. हल्ल्यामागे दहशतवादी संघटनांचा हात आहे का याविषयी पोलिसांनी प्रतिक्रिया दिलेली नाही.

शुक्रवारी फिनलॅण्डमधील तुरकू या शहरात चाकू हल्ल्याची घटना घडली होती. या हल्ल्यात दोन जणांचा मृत्यू झाला होता. याप्रकरणी पोलिसांनी एका संशयिताला अटक केली होती. तर गुरुवारी बार्सिलोनामध्ये दहशतवादी हल्ला झाला होता. गर्दीत कार घुसवून केलेल्या हल्ल्यात १३ जणांचा मृत्यू झाला होता. आयसिस या दहशतवादी संघटनेने या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली होती. या सर्व घटनांच्या पार्श्वभूमीवर चाकू हल्ल्याच्या घटनेने रशियातील सुरक्षा यंत्रणा सतर्क झाल्या आहेत.