पाकिस्तानला नुकतेच रशियन बनावटीचे एमआय-१७१ ई हेलिकॉप्टर मिळाले असून ते युद्धासाठी नसलेले (नॉन-कॉम्बॅट) प्रकारचे आहे. या वर्षांत असे दुसरे हेलिकॉप्टर मिळणे हे पाकिस्तान व रशिया यांच्यातील वाढत्या संबंधांचे निदर्शक असल्याचे एका माध्यमाच्या वृत्तात म्हटले आहे.

एमआय- १७१ हे एमआय-१७ लष्करी मालवाहतूक हेलिकॉप्टरचा नागरी प्रकार असून तो याआधीच पाकिस्तानी लष्कराच्या सेवेत आहे. दुसरे हेलिकॉप्टर पाकिस्तानच्या अशांत बलुचिस्तानात प्रांतासाठी मागवण्यात आले आहे.

रूपांतर होणारे (कनव्हर्टिबल) एमआय १७१ हेलिकॉप्टर प्रवासी किंवा मालवाहतूक, वैद्यकीय, शोध व बचावकार्य अशा कुठल्याही मोहिमेत उत्तम कामगिरी बजावेल असा मला विश्वास आहे, असे रशियन हेलिकॉप्टर्सचे मुख्य कार्यकारी अधिकारी अँद्रेई बोगिन्स्किी यांनी म्हटल्याचे वृत्त रशियाच्या ‘तास’ वृत्तसंस्थेने दिले.

या हेलिकॉप्टरमधील सीट्स काढून टाकल्यास १४ स्ट्रेचर्स वाहून नेण्याच्या क्षमतेमुळे वैद्यकीय आणीबाणीच्या प्रसंगी या हेलिकॉप्टरचा वापर रुग्णवाहिका म्हणूनही करता येऊ शकतो. रशियन हेलिकॉप्टर्सने या हेलिकॉप्टरच्या पुरवठय़ाचा करार बलुचिस्तान प्रांताच्या सरकारशी डिसेंबर २०१६ मध्ये केला होता. हे हेलिकॉप्टर ‘कन्व्हर्टिबल’ पर्यायात तयार करण्यात आले होते. मालवाहतुकीसाठी असलेल्या त्याच्या कॅबिनचे रूपांतर ग्राहकाला हवे असल्यास फार कमी वेळात १३ सीट्स व एक फ्लाइट अटेन्डंट असलेल्या व्हीआयपी कॅबिनमध्ये होऊ शकते. २७ प्रवासी आणि ४ टनांपर्यंतचे वजन वाहून नेण्याची त्याची क्षमता आहे.