माजी परराष्ट्रमंत्री एस. एम. कृष्णा यांच्या जावयाच्या विविध ठिकाणांवर प्राप्तिकर विभागाने टाकलेल्या छाप्यांत ६५० कोटी रुपयांपेक्षा जास्त अघोषित संपत्तीची माहिती मिळाली आहे. प्राप्तिकर विभागाच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, कृष्णा यांचे जावई व्ही. जी. सिद्धार्थ यांच्या २५ ठिकाणांवर ही छाप्याची कारवाई मागील चार दिवसांपासून सुरू होती. यादरम्यान त्यांच्या कॉफी कॅफ डे चेनशी संबंधित मालमत्तांवरही छापे टाकण्यात आले. ही कारवाई बंगळुरू, हासन, चिकमंगळूर, चेन्नई आणि मुंबईत करण्यात आली. विशेष म्हणजे कृष्णा यांनी नुकताच भाजपमध्ये प्रवेश केला होता.

सिद्धार्थ हे कॉफी चेनचे अर्धवेळ मालक असल्याचेही सांगितले जात आहे. कॉफी, पर्यटन, आयटी आणि इतर क्षेत्रांतील त्यांच्या कंपन्या आणि संपत्तीची तपासणी करण्यात आली. यासंदर्भात त्यांच्याकडे असणाऱ्या विविध कागदपत्रे आणि बँक खात्यांचीही चौकशी होत आहे.