पाकिस्तानमध्ये होणाऱ्या सार्क परिषदेत बांगलादेश आणि भूताननेही सामील न होण्याचा निर्णय घेतला आहे. इंडियन एक्स्प्रेसला दिलेल्या वृत्तानुसार, बांगलादेश, अफगाणिस्तान आणि भूतान या दोन्ही देशांनी आपली भूमिका स्पष्ट केली असून अशा वातावरणात चर्चा करणे ठीक नसल्याचे त्यांनी म्हटले आहे. मंगळवारीच बांगलादेशाने नेपाळला (सार्क प्रमुख) याबाबत कळवल्याचे इंडियन एक्स्प्रेसने म्हटले आहे. एक देश वारंवार आमच्या अंतर्गत घटनांमध्ये हस्तक्षेप करण्याचा प्रयत्न करतो. अशा वातावरणात १९ व्या सार्क बैठकीत चर्चा होऊ शकते असे आम्हाला वाटत नाही असे बांगलादेशाने नेपाळला कळवले आहे.
त्याचबरोबर भूताननेही नेपाळला पत्र लिहून सार्क परिषदेत सहभागी होण्यास असमर्थतता व्यक्त केली आहे. बांगलादेश नेहमी सौहार्दपूर्ण संबंध बनवण्याच्या बाजूने राहिला आहे. परंतु त्यासाठी तसे वातावरण असण्याचीही गरज आहे. दहशतवादामुळे क्षेत्रीय शांतता आणि सुरक्षा धोक्यात आली आहे.
तत्पूर्वी, पंतप्रधान नरेंद्र मोदी हे पाकिस्तानमध्ये होणाऱ्या सार्क परिषदेत सहभागी होणार नसल्याचे परराष्ट्र मंत्रालयाने मंगळवारी सांगितले होते. सीमेवर दहशतवादी हालचाली वाढत आहेत. देशातील अंतर्गत मुद्यांवरही वारंवार हस्तक्षेप केला जातोय. अशा परिस्थितीत इस्लामाबादमध्ये होणाऱ्या बैठकीत भारत सहभागी होणार नसल्याचे म्हटले होते.
भारताच्या या घोषणेनंतर पाकिस्तानने त्यांना अशाप्रकारची काही सूचना मिळाली नसल्याचे म्हटले होते. या बैठकीपासून नेपाळही लांब राहण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे सार्क परिषदच रद्द होणे निश्चित मानले जाते.