पाकिस्तानमध्ये नोव्हेंबरमध्ये होणा-या सार्क परिषदेवर भारताने बहिष्कार टाकल्यावर आता ही परिषद पुढे ढकलली जाण्याची किंवा रद्द होण्याची शक्यता आहे. भारतासह अफगाणिस्तान, बांगलादेश, भूटान या देशांनीही सार्क परिषदेवर बहिष्कार टाकल्याने पाकिस्तानची नाचक्की झाली आहे. तर पाकिस्तानने मात्र ही परिषद होणारच असा दावा केला आहे.
इस्लामाबादमध्ये ९ आणि १० नोव्हेंबररोजी १९ वी सार्क परिषद पार पडणार होती. सार्क देशांमधील करारानुसार या परिषदेत आठपैकी एका देशानाही सहभागी होण्यास नकार दिला तर ही परिषद पुढे ढकलण्यात येते किंवा रद्द केले जाते. सध्याच्या वातावरणात चर्चा करणे योग्य नसल्याचे बांगलादेश, अफगाणिस्तान आणि भूतानने सांगितले होते. या देशांनी त्यांचा निर्णय सध्या सार्क परिषदेचे अध्यक्षपद असलेल्या नेपाळला कळवला आहे. सार्कचे प्रमुख अर्जून बहादूर थापा हे सध्या न्यूयॉर्क दौ-यावर असून ते दोन दिवसांनी नेपाळमध्ये परततील. नेपाळमध्ये परतल्यावर ते परिषद पुढे ढकलायची किंवा रद्द करायची याबाबत अंतिम निर्णय घेणार आहेत.
उरी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर मंगळवारी भारताने सार्क परिषदेत सहभागी होण्यास नकार दिला होता. “दक्षिण आशियाई विभागाचा विकास आणि परस्पर सहकार्य याविषयी भारत कटिबद्ध आहे. पण हे सर्व दहशतवादमुक्त वातावरणातच होऊ शकते. या भागातील एक राष्ट्र दहशतवादमुक्त वातावरणाच्या विरोधात काम करत आहे. अशा वातावरणात भारत सार्क परिषदेत सहभागी होणार नाही असे सांगत भारताने सार्क परिषदेत सहभागी होण्यास नकार दिला होता. भारतानंतर बांगलादेशनेही आमच्या अंतर्गत प्रश्नांमध्ये एका देशाचा हस्तक्षेप वाढल्याचे सांगत सार्कमध्ये सहभागी होण्यास नकार दिला होता. अफगाणिस्ताननेही दहशतवादाचे कारण पुढे करत परिषदेत सहभागी होता येणार नाही असे म्हटले होते. तर भारताच्या गैरहजेरीत ही परिषद अशक्य आहे असे श्रीलंकेने म्हटले आहे. या पार्श्वभूमीवर आता नोव्हेंबरमध्ये सार्क परिषदेवरच प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहेत. पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते नाफीस झकारिया यांनी मात्र ही परिषद होणारच असे सांगितले. भारताच्या निर्णयाविषयी आम्हाला अधिकृतरित्या माहिती मिळालेली नाही. पण भारताने असा निर्णय घेतला असेल तर ते दुर्दैवी आहे असे त्यांनी म्हटले होते.