मास्टरब्लास्टर सचिन तेंडुलकर आणि बॉलीवूडची अभिनेत्री रेखा यांच्यासारखे राज्यसभेवर नियुक्त करण्यात आलेले सदस्य सभागृहात सातत्याने अनुपस्थित राहू शकतात का आणि त्यांना सभागृहाच्या कामकाजात स्वारस्य नसले तर त्यांनी राजीनामा का देऊ नये, असा सवाल गुरुवारी राज्यसभेत उपस्थित करण्यात आला.

सपाचे सदस्य नरेश अग्रवाल यांनी हा प्रश्न उपस्थित केला. संसदेचे हे अधिवेशन सुरू झाल्यापासून आपण सचिन तेंडुलकर आणि रेखा यांना सभागृहाच्या कामकाजात भाग घेताना पाहिले नाही, असे अग्रवाल म्हणाले. हरकतीच्या मुद्दय़ाद्वारे अग्रवाल यांनी हा प्रश्न मांडला.

सचिन तेंडुलकर आणि रेखा सभागृहात हजर नाहीत याचा अर्थ त्यांना स्वारस्य नाही का आणि त्यांना स्वारस्य नसेल तर त्यांनी राजीनामा द्यावा का, असा सवाल अग्रवाल यांनी केला.

हा हरकतीचा मुद्दा नसल्याचे उपसभापती पी. जे. कुरियन यांनी स्पष्ट केले. नियुक्त सदस्यांनी काही दिवस तरी सभागृहात उपस्थित राहावे यासाठी अग्रवाल यांनी त्यांचे मन वळवावे, असे कुरियन म्हणाले.