सहाराचे सर्वेसर्वा सुब्रतो रॉय यांनी सेबीकडे आणखी ३०० कोटी रुपये भरण्याची तयारी दर्शवली आहे. शुक्रवारी रॉय यांच्यावतीने सुप्रीम कोर्टाला ही माहिती देण्यात आलाी आहे. आणखी पैसे भरण्याच्या निर्णयामुळे रॉय यांना कोर्टाकडून दिलासा मिळण्याची शक्यता आहे.
सहारा प्रमुख सुब्रतो रॉय यांना ४ मे २०१४ रोजी अटक करण्यात आली होती. गुंतवणूकदारांची फसवणूक केल्याप्रकरणी ते अडचणीत आले होते. रॉय यांनी गुंतवणूकदारांचे १७, ५०० कोटी रुपये १५ टक्के व्याजासह परत करावे असे आदेश देण्यात आले होते. मात्र या आदेशांचे रॉय यांनी पालन केले नाही आणि शेवटी त्यांना तुरुंगाची हवा खावी लागली. सुमारे दोन वर्ष तुरुंगाची हवा खाल्ल्यानंतर या वर्षी मेमध्ये रॉय यांना दोन महिन्यांसाठी पॅरोल मंजूर करण्यात आला होता. यानंतर ११ जुलै रोजी पुन्हा सुप्रीम कोर्टाने सुब्रतो रॉय यांच्या पॅरोलमध्ये वाढ केली. सुब्रतो रॉय यांच्या मातोश्रीचे निधन झाल्याच्या पार्श्वभूमीवर कोर्टाने हा निर्णय दिला होता. मात्र पॅरोल देतानाच ५०० कोटींपैकी ३०० कोटी रुपये भरण्याची अटही कोर्टाने टाकली होती. आता ३ ऑगस्टरोजी झालेल्या सुनावणीत कोर्टाने सुब्रतो रॉय यांच्या पॅरोलमध्ये १६ सप्टेंबरपर्यंत वाढ केली होती. सेबीकडे ३०० कोटी रुपये भरता यावे यासाठी त्यांच्या पॅरोलमध्ये वाढ करण्यात आली होती.