सहारणपूर येथे झालेल्या चकमकीप्रकरणी ३८ जणांना अटक करण्यात आली असून दिसता क्षणी गोळ्या घालण्याचे आदेश देण्यात आले आहेत. दोन जमातींमध्ये जमिनीवरून चकमक झाली होती. यावेळी २२ दुकाने व १५ चारचाकी वाहने जाळण्यात आली.
जिल्हा दंडाधिकारी संध्या तिवारी यांनी सांगितले की, शनिवारपेक्षा परिस्थिती नियंत्रणात असून शहरात कायदा व सुव्यवस्था राबवण्यासाठी आपण प्रयत्नशील आहोत. कालच्या हिंसाचारात तीन ठार व एका पोलिसासह १९ जण जखमी झाले होते. जमावाने लुटालूट व जाळपोळ केल्यानंतर तेथे संचारबंदी लागू करण्यात आली व दिसताक्षणी गोळ्या घालण्याचे आदेश देण्यात आले.
जखमींमध्ये पाच पोलीस, शहर दंडाधिकारी व इतर १३ जणांचा समावेश असून कॉन्स्टेबल शेनसार पाल यांची प्रकृती चिंताजनक आहे. जमिनीच्या वादाबाबत तिवारी यांनी सांगितले की, आम्ही त्यात पडणार नाही, पण सदर इमारत आहे तशी आहे. या प्रकरणी २० जणांना अटक करण्यात आली असून पोलिसांनी जमावाला पांगवण्यासाठी रबरी गोळ्या झाडल्या.
 कलम १४४ अन्वये प्रतिबंधात्मक आदेश लागू करण्यात आले असून सहा विभागात संचारबंदी लागू करण्यात आली, असे सहारणपूरचे आयुक्त तन्वीर झफर अली यांनी सांगितले. निमलष्करी दले, जलद कृती दले, इंडो-तिबेट दले तैनात करण्यात आली आहेत. कुतुबशेर येथे शनिवारी पहाटे एका जमातीच्या लोकांनी बांधकाम करण्यास सुरूवात केली असता दुसऱ्या गटाने आक्षेप घेतला. त्यानंतर त्यांनी एकमेकांवर दगडफेक करीत दुकानांची जाळपोळ केली.
सहारणपूर दिल्लीपासून १७० कि.मी. अंतरावर असून लखनौपासून ५६० कि.मी. अंतरावर आहे. पोलिस अधीक्षक राजेंद्र चौधरी यांनी सांगितले की, विरोधकांनी राजकारण करण्याचा प्रयत्न केला तर कायदा आपले काम करील. स्थानिक अधिकाऱ्यांनी प्रशासकीय चुका केल्या असा आरोप करून काँग्रेस नेत्या रिटा बहुगुणा यांनी सांगितले की, या प्रकरणी न्यायालयाचा निकाल आहे व पोलिसांची मदत मागण्यात आली होती. न्यायालयाचा आदेश दोन्ही बाजूंना समजावण्याचे काम अधिकाऱ्यांचे होते.
भाजप नेते शहानवाझ हुसेन यांनी सांगितले की, उत्तर प्रदेशात प्रशासन अपयशी ठरले असून लोकच राज्य करीत आहेत, मतांचे राजकारण करण्यात सरकारला स्वारस्य आहे. भाजपला मात्र शांतता व सलोखा हवा आहे. प्रत्येकाला धर्माचरणाचा अधिकार आहे पण त्याचे संरक्षण करण्यात अखिलेश यादव सरकार अपयशी ठरले आहे.
केंद्रात भाजप सत्तेवर आल्याने या घटना वाढल्या आहेत, असा आरोप राजदचे मनोज झा यांनी केला. मुख्यमंत्री अखिलेश यादव यांनी सहारणपूरच्या अधिकाऱ्यांकडून अहवाल मागवला असून ही घटना दुर्दैवी असल्याचे सांगितले. याला जबाबदार व्यक्तींना मोकळे सोडणार नाही असेही ते म्हणाले. केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंग यांनी फोनवर अखिलेश यादव यांच्याशी चर्चा केली व त्यांना हवी ती मदत देण्याची तयारी दर्शवली.