उत्तर प्रदेशमधील सहारणपूर येथे गेल्या महिन्यात झालेल्या जातीय दंगलीमागे भाजपच्या एका खासदाराची चिथावणी जबाबदार असल्याचा ठपका राज्य सरकारच्या समितीने रविवारी ठेवला. त्यामुळे उत्तर प्रदेशमधील सत्ताधारी समाजवादी पक्ष आणि भाजप यांच्यात वाक्युद्ध सुरू झाले असून, राज्यातील वातावरण तापले आहे.
‘समितीच्या अहवालात भाजपच्या एका खासदाराचे नाव असून, प्रशासकीय हलगर्जीवरही यात बोट ठेवण्यात आले आहे,’ अशी माहिती सपाचे राष्ट्रीय सरचिटणीस नरेश अग्रवाल यांनी दिली. भाजपचे खासदार राघव लखनपाल यांनी दंगेखोरांना चिथावणी दिल्याने त्यांनी दुकाने पेटवून दिली व दंगल पेटली, असा ठपका या समितीने ठेवला आहे. ‘भाजपच्या एका खासदारावर ठपका ठेवण्यात आल्याने या दंगलीत भाजपचा सहभाग स्पष्ट होतो आहे,’ असे अग्रवाल म्हणाले.
लखनपाल यांनी हे आरोप फेटाळत समाजवादी पक्ष खालच्या पातळीचे राजकारण करत असल्याची टीका केली आहे. एका विशिष्ट समाजाला चुचकारण्याचा राज्य सरकारचा प्रयत्न असल्याचे ते म्हणाले.
 केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी सांगितले की, आपण अहवाल पाहिलेला नाही पण हा एका राजकीय पक्षाने बनवलेला अहवाल आहे. काँग्रेसने मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जातीयवाद सहन न करण्याबाबत दिलेले आश्वासन पूर्ण करताना सहारणपूरच्या भाजप खासदारावर कारवाई करावी, अशी अपेक्षा व्यक्त केली.
* सहारणपूर येथे २६ जुलै रोजी झालेल्या या दंगलीत तीन जण ठार झाले होते.
* या दंगलीची चौकशी करण्यासाठी उत्तर प्रदेश सरकारने राज्यातील मंत्री शिवपाल यादव यांच्या नेतृत्वाखाली पाच सदस्यांची समिती नेमली होती.
* या समितीने रविवारी आपला अहवाल मुख्यमंत्री अखिलेश यादव यांच्याकडे सादर केला.  त्यात भाजपच्या एका खासदाराने दंगेखोरांना चिथावणी दिल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे.