उत्तर प्रदेशातील सहारनपूरमध्ये हिंसाचार उफाळल्यानंतर राजकीय आरोप-प्रत्यारोप सुरू झाले आहेत. हिंसाचाराच्या घटनेला मायावती जबाबदार असल्याचा आरोप भाजपने केल्यानंतर बहुजन समाज पक्षानेही पलटवार केला आहे. जातीय हिंसाचार आणि त्यात झालेल्या जीवित आणि वित्तहानीला भाजप जबाबदार आहे, असा आरोप पक्षाच्या प्रमुख मायावती यांनी केला आहे. भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे जातीयवादी विचार सामाजिक सलोखा बिघडवण्याचे काम करत आहेत, असेही त्या म्हणाल्या.

[jwplayer 9xaU4cUi-1o30kmL6]

बसपचे चार पदाधिकारी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची भेट घेणार आहेत. त्यात सतीश मिश्र, राम अचल राजभर, लालजी वर्मा, माजी मंत्री इंदरजीत सरोज यांचा समावेश आहे. दरम्यान, मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षानेही सहारनपूर हिंसाचाराच्या घटनेचा निषेध केला आहे. मायावतींच्या रॅलीनंतर उफाळलेल्या जातीय हिंसाचाराच्या घटनेला हिंदू युवा वाहिनी जबाबदार आहे, असा आरोप त्यांनी केला आहे. तत्पूर्वी भाजपने मायावतींवर निशाणा साधला होता. उत्तर प्रदेशचे मंत्री श्रीकांत शर्मा यांनी मायावतींवर आरोप केला होता. सहारनपूरमध्ये शांतता प्रस्थापित झाली होती. पण राजकीय पोळी भाजण्यासाठी मायावती तिथे गेल्या आणि त्यानंतर घटना घडली, असा आरोप त्यांनी केला होता. दोषींविरोधात कठोर कारवाई करण्यात येईल, अशी ग्वाहीही त्यांनी दिली होती.

दरम्यान, हिंसाचाराच्या घटनेची पोलीस आणि स्थानिक प्रशासनाने गंभीर दखल घेतली आहे. मुख्यमंत्र्यांच्या आदेशानंतर पोलीस आणि प्रशासनातील सर्व वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सहारनपूर परिसरात ठाण मांडले आहे. दुसरीकडे परिस्थितीवर नियंत्रण मिळवण्यात अपयशी ठरल्याचा ठपका ठेवत राज्य सरकारने जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षकांना पदावरून हटवले आहे. विशेष म्हणजे दुसऱ्या दिवशीही परिस्थिती तणावपूर्ण आहे. पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला आहे.