उत्तर प्रदेशातील हिंसाचारग्रस्त सहारणपूर या ठिकाणी आता परिस्थिती नियंत्रणात असून केंद्र सरकार परिस्थितीवर लक्ष ठेवून आहे, असे केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिह यांनी सांगितले.
सहारणपूर येथील परिस्थिती नियंत्रणात असल्याचे सांगून ते म्हणाले की, आपण उत्तर प्रदेशातील सहारणपूरच्या हिंसाचारानंतर आताच्या परिस्थितीची कल्पना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेऊन दिली.
गृह मंत्रालयाने अगोदरच ६०० निमलष्करी सैनिक तेथील प्रशासनाला कायदा व सुव्यवस्था सुरळीत ठेवण्यासाठी पाठवले आहेत. राजनाथ सिह यांनी शनिवारी मुख्यमंत्री अखिलेश यादव यांच्याशी चर्चा करून त्यांना सहारणपूर येथील हिंसाचार आटोक्यात आणण्यासाठी मदत करण्याचे आश्वासन दिले होते. सहारणपूर येथे एका जागेवर एका जमातीच्या लोकांनी बांधकाम करण्याचा प्रयत्न केला असता दुसऱ्या जमातीच्या लोकांनी त्याला आक्षेप घेतला त्यातून हिंसक घटना घडल्या त्यात ३३ जण जखमी झाले असून ३८ जणांना अटक करण्यात आली आहे. हिंसाचाराच्या वेळी अनेक वाहनेही जाळण्यात आली होती.
सहारणपूर येथील परिस्थिती सुधारत असून जिल्हाधिकाऱ्यांनी संचारबंदी आता काही तासांसाठी शिथिल केली आहे. शहराच्या नवीन भागात लोकांना वस्तू खरेदीसाठी बाजारपेठा सुरू करण्यात आल्या आहेत.