विषारी फळे खाऊन आत्महत्येचा प्रयत्न करणाऱया तीन महिला क्रीडापटूंच्या प्रकृतीत किंचित सुधारणा झाली असल्याची माहिती त्यांच्यावर उपचार सुरू असलेल्या रुग्णालयातील सूत्रांनी दिली. मात्र, अद्याप या क्रीडापटूंच्या जीवाला असलेला धोका कायम असल्याचेही स्पष्ट करण्यात आले.
चार महिला क्रीडापटूंनी केरळमधील स्पोर्ट्स अ‍ॅथॉरिटी ऑफ इंडियाच्या (साई) केंद्रात आत्महत्येचा प्रयत्न केला. यात एक १५ वर्षीय क्रीडापटूचा मृत्यू झाला. इतर तिघींवर सध्या उपचार सुरू आहेत. या चौघींनीही विषारी फळ खाल्ल्यानंतर त्यांना त्रास होऊ लागल्याने रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. उपचार सुरू असलेल्या तिन्ही क्रीडापटूंना इतर स्पेशालिटी रुग्णालयात हलविण्याचाही विचार सुरू असल्याचे डॉक्टरांनी सांगितले.
‘साई’चे महासंचालक इंजेती श्रीनिवास यांनी या घटनेत मृत्युमुखी पडलेली क्रीडापटू अपर्णा रमाभद्रन हिच्या निवासस्थानी जाऊन तिच्या नातेवाईकांची शुक्रवारी भेट घेतली. तिच्या नातेवाईकांना यावेळी पाच लाख रुपयांचा मदतीचा धनादेश देण्यात आला आणि अपर्णाची आई गीता हिला नोकरी देण्याची ऑफर देण्यात आली.