काळवीट शिकार प्रकरणात बेकायदेशीर शस्त्र बाळगल्याप्रकरणी अभिनेता सलमान खानला जोधपूर न्यायालयाने दिलासा दिला आहे. बेकायदेशीरपणे शस्त्र बाळगल्याप्रकरणी सलमान खानची न्यायालयाने निर्दोष सुटका केली आहे.

जोधपूर न्यायालमध्ये बुधवारी बेकायदा शस्त्र बाळगल्याप्रकरणी सुनावणी झाली. सुनावणीसाठी सलमान खान उशीरा पोहोचल्याने न्यायाधीश संतापले होते. शेवटी न्यायाधीशांनी अर्धा तासात सलमानला न्यायालयात हजर राहण्याचे आदेश दिले. यानंतर काही वेळात सलमान न्यायालयात हजर झाला. सलमानविरोधात वन्यजीव संरक्षण कायदा आणि आर्म्स अॅक्टमधील कलम ३/२५ व ३/२७ या कलमांखाली गुन्हा दाखल होता. यातील आर्म्स अॅक्टच्या गुन्ह्यातून न्यायालयाने सलमानला दोषमुक्त केले. सलमानने शिकार करताना अमेरिकन बनावटीची रिव्हॉल्वर आणि बंदुकीचा वापर केल्याचा आरोप होता. सलमानला दोषमुक्त केल्याचे वृत्त समजताच न्यायालयाबाहेर जमलेल्या सुलतानच्या समर्थकांनी एकच जल्लोष केला.

सलमानविरोधात सबळ पुरावा नव्हता. संशयाचा फायदा देत न्यायालयाने सलमानला दोषमुक्त केले. १०२ पानी निकालात न्यायाधीशांनी सरकारी पक्षाने सलमानविरोधात पुरेसे पुरावे दिले नाही असे सांगत सलमानच्या बाजूने निकाल दिला. न्यायाचा विजय झाला असून सरकारी वकील आरोप सिद्ध करण्यात अपयशी ठरले अशी प्रतिक्रिया सलमानच्या वकिलांनी दिली आहे. न्यायालयाने दिलेल्या निकालाचा अभ्यास केल्यानंतर आम्ही पुढील निर्णय घेऊ असे सरकारी वकिलांनी सांगितले.

१९९८ मध्ये ‘हम साथ साथ है’ चित्रपटाच्या चित्रिकरणादरम्यान कंकणीजवळ सलमान व त्याच्या सहकाऱ्यांनी चिंकारा काळविटाची शिकार केल्याचा आरोप होता. बिष्णोई समाजाच्या तक्रारीनंतर २ ऑक्टोबर १९९८ रोजी याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानंतर १२ ऑक्टोबरला सलमानला अटकही करण्यात आली होती. मात्र, पाच दिवसांनी त्याची जामीनावर सुटका झाली होती. २००६ मध्ये वन्य प्राणी कायद्यानुसार जोधपूर येथील भवद जवळ चिंकाराची शिकार केल्या प्रकरणी सलमानला एक वर्ष कारावास आणि ५००० रूपये दंडाची शिक्षा सुनावण्यात आली होती. सलमान व्यतिरिक्त अभिनेता सैफ अली खान, अभिनेत्री सोनाली बेंद्रे, तब्बू आणि नीलम यांच्यावर देखील दोन काळविटाची शिकार केल्याचा गुन्हा नोंदवण्यात आला होता. काळवीटची शिकार करणे, बेकायदेशीरपणे शस्त्र बाळगणे आणि शस्त्रास्त्रांचा गैरवापर अशा विविध कलमांखाली सलमान खानविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. राजस्थान हायकोर्टाने गेल्यावर्षी जुलैमध्ये सलमानची काळवीट शिकार प्रकरणातून निर्दोष सुटका केली होती. कोर्टाने सलमान खानच्या परदेशवारीवर निर्बंध घातले होते. मात्र राजस्थान सरकारने याविरोधात पुन्हा सुप्रीम कोर्टात याचिका दाखल केली होती.