‘बजरंगी भाईजान’ हा भारत-पाकिस्तान मैत्रीवरील चित्रपट पाहण्यासाठी पाकिस्तानातील प्रेक्षक मोठय़ा संख्येने जात आहेत. हा चित्रपट येऊन आठवडा झाला तरी गर्दी कमी झालेली नाही. तेथील लोकांना हा चित्रपट खूप आवडला आहे. चित्रपटगृह मालकांनी असा दावा केला की, लोक चित्रपटगृहातून बाहेर पडतात त्यावेळी त्यांचे डोळे पाणावलेले असतात. बजरंगी भाईजान चित्रपटात पवनकुमार चतुर्वेदी या पात्राची भूमिका सलमान खानने केली असून तो एका मुक्या पाकिस्तानी मुलीला पाकिस्तानातील तिच्या घरी नेऊन सोडतो, अशी ही हृदयद्रावक कथा आहे.
लाहोर येथील सिनेस्टार सिनेमाचे शहाराम रझा यांनी सांगितले की, गेली सात वर्षे आपण चित्रपट उद्योगात आहोत, पण चित्रपट पाहण्यासाठी इतकी गर्दी कधी पाहिलेली नाही. रझा हे तिकीट खिडकीवर काम करतात व बजरंगी भाईजान चित्रपटाची तिकिटे खरेदी करताना त्यांना लोकांच्या चेहऱ्यावर कमालीचा उत्साह दिसतो. चित्रपट संपल्यानंतर अनेक स्त्री- पुरूष साश्रू नयनांनी बाहेर पडतात. विशेष म्हणजे इतर चित्रपट संपल्यानंतर लोक तावातावाने बोलत बाहेर येतात पण या चित्रपटाच्या वेळी बाहेर पडताना मात्र तेच मुके होऊन जातात.
काहींनी हा चित्रपट दोनदा पाहिला आहे. त्यात मोमीना राणा यांचा
समावेश आहे. पाकिस्तानला सकारात्मक प्रतिमेत दाखवणारा हा पहिला चित्रपट आहे असे त्यांचे म्हणणे आहे.