उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीत सप २९८, तर काँग्रेस १०५ जागांवर लढणार

गेले अनेक दिवस चाललेला घोळ रविवारी संपुष्टात येऊन समाजवादी पक्ष आणि काँग्रेस यांनी उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीसाठी युती केली आहे. विधानसभेच्या ४०३ जागांपैकी २९८ जागी समाजवादी पक्ष, तर उर्वरित १०५ जागांवर काँग्रेस निवडणूक लढणार असल्याचे या पक्षांच्या संयुक्त पत्रकार परिषदेत जाहीर करण्यात आले.

सप व काँग्रेस यांनी युती केली असून ते राज्य विधानसभेची निवडणूक एकत्र लढतील, असे सपचे प्रदेशाध्यक्ष नरेश उत्तम यांनी घाईघाईने बोलावलेल्या पत्रकार परिषदेत सांगितले. ही युती निवडणुकीत भरघोस यश मिळवेल, अशी आशा काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष राज बब्बर यांनी व्यक्त केली. युतीचा समान किमान कार्यक्रम एका आठवडय़ाच्या आत तयार करण्यात येईल असेही ते म्हणाले.

काँग्रेस व समाजवादी पक्षाच्या उच्चपदस्थ नेत्यांमध्ये युतीची बोलणी गेले अनेक दिवस सुरू होती. मात्र, प्रत्येक पक्ष लढणार असलेल्या जागांची संख्या कमी करण्यास कुणीही तयार नसल्यामुळे या मुद्दय़ावर गाडे अडले होते. काँग्रेसच्या अध्यक्ष सोनिया गांधी यांच्या हस्तक्षेपानंतर ही युती निश्चित झाल्याची माहिती सूत्रांनी दिली.

दोन्ही पक्षांच्या उच्चपदस्थ नेत्यांनी जागावाटपाला रविवारी पहाटे अंतिम रूप दिल्याचे सूत्रांनी सांगितले. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री, काँग्रेसचे निवडणूक प्रभारी व सरचिटणीस आणि प्रियंका गांधी यांच्यात उच्च पातळीवर चर्चा सुरू असल्याचे ट्वीट पक्षाचे नेते अहमद पटेल यांनी केले होते.

दोन्ही पक्षांनी जागांच्या संख्येबाबत आपली भूमिका कठोर केल्यामुळे उत्तर प्रदेशात सप व काँग्रेस यांच्यात युतीचे भवितव्य संकटात सापडले होते. सपचे नेते नरेश अग्रवाल यांनी तर एका टप्प्यावर, युतीची शक्यता ‘जवळजवळ संपुष्टात आली’ असल्याचे सांगून या कोंडीसाठी काँग्रेसच्या ‘दुराग्रही’ भूमिकेला दोष दिला होता. मुख्यमंत्री अखिलेश यादव यांनी सुरुवातीला काँग्रेसला १०० जागा देऊ केल्या होत्या, पण त्यांनी १२० जागांची मागणी केली होती.

आपले २३४ विद्यमान आमदार असून आणखी काहीजण पक्षाकडून निवडणूक लढणार असल्याचे समाजवादी पक्षाने म्हटले होते. अशा प्रकारे या सत्ताधारी पक्षाला ४०३ पैकी किमान ३०० जागा हव्या होत्या. मात्र, अशा परिस्थितीत युती होऊ शकत नाही असे काँग्रेसच्या नेत्यांनी त्यांना कळवले होते. दुसऱ्या बाजूला, काँग्रेसच्या केंद्रीय निवडणूक समितीने दिल्लीत बैठक घेऊन पहिल्या दोन टप्प्यांतील निवडणुकांसाठी १४० जागांवर उमेदवारांची यादी निश्चित केली होती. तथापि, या जागांवरील उमेदवारांची घोषणा न करता त्यांनी संभाव्य युतीसाठी वाव ठेवला होता. त्यासाठीची बोलणी रविवारी पहाटेपर्यंत सुरू राहिली.

अजित सिंग यांच्या नेतृत्वातील राष्ट्रीय लोकदलाचाही युतीत समावेश करण्याचा काँग्रेसचा आग्रह होता, मात्र सप त्यासाठी इच्छुक नव्हता. काँग्रेसला राजद सोबत हवा असेल तर त्यांनी त्यांच्या वाटय़ातील जागा सोडाव्या, अशी भूमिका सपने घेतली होती.

सपचा जाहीरनामा घोषित

लखनौ : समाजवादी पक्षाने रविवारी घोषित केलेल्या जाहीरनाम्यात राज्याच्या सर्वागीण विकासाकरिता भरघोस योजनांचे आश्वासन दिले. मुख्यमंत्री अखिलेश यादव यांनी ज्या कार्यक्रमात जाहीरनाम्याची घोषणा केली, त्याला पक्षाचे प्रमुख मुलायमसिंग यादव व त्यांचे भाऊ शिवपाल हे गैरहजर होते. लॅपटॉपचे वाटप, कन्या विद्याधन, समाजवादी पेन्शन, पूर्वाचल एक्स्प्रेसचे बांधकाम, जनेश्वर मित्रा आदर्श खेडय़ांची निर्मिती, तसेच पोलीस व महिला यांच्यासाठी अधिक चांगली हेल्पलाइन तयार करणे यासारख्या योजनांचा जाहीरनाम्यात समावेश आहे. शेतकऱ्यांना बियाणे व खते खरेदी करण्यासाठी समाजवादी किसान कोषाचीही जाहीरनाम्यात तरतूद असून, प्रधानमंत्री किसान बीमा योजनेला पर्याय देण्यासाठी ती आखली असण्याची शक्यता आहे. जनेश्वर मिश्रा यांच्या नावाने आदर्श खेडी तयार करणे ही रविवारी साजऱ्या होत असलेल्या त्यांच्या स्मृतिदिनानिमित्त श्रद्धांजली ठरेल, असे अखिलेश म्हणाले.