मुलायमसिंह यादव व अखिलेश यांच्यात वादावादी; शिवपाल, अमरसिंह यांची पाठराखण

समाजवादी पक्षाचे सर्वेसर्वा मुलायमसिंह यादव यांनी सोमवारी येथे बोलावलेली पक्षाची बैठक कटुता, कडवट शाब्दिक प्रहार आणि वैयक्तिक हल्ले या गोंधळातच संपली. विशेष म्हणजे मुलायम आणि त्यांचे पुत्र मुख्यमंत्री अखिलेश यादव यांच्यात वादावादी झाली. अमरसिंह हे भावाप्रमाणे आहेत तर शिवपाल हे जनाधार असलेले नेते असल्याचे सांगत मुलायमसिंह यांनी त्यांचे समर्थन केले. तसेच अखिलेश हे मुख्यमंत्री म्हणून कायम राहतील असे जाहीर केले. या गदारोळात समाजवादी पक्षातील वाद चव्हाटय़ावर आला. पक्ष बिकट अवस्थेतून जात असून, एकमेकांशी भांडू नये असे आवाहन मुलायमसिंह यादव यांनी बैठकीत केले मात्र त्याचा काहीच परिणाम झाला नाही.  वादावादी झाल्याने बैठक गुंडाळावी लागली.  पक्षाच्या स्थापना दिवसाचा रौप्यमहोत्सव येत्या ५ नोव्हेंबरला  होणार असून ३ नोव्हेंबरपासून अखिलेश यादव हे ‘रथयात्रा’ काढणार आहेत. यामुळे नाखूश असलेले अखिलेश स्थापना दिवसाच्या कार्यक्रमाला हजर राहणे टाळतील अशी चर्चा आहे. मात्र हे दोन्ही कार्यक्रम होतील,असे अखिलेश यांनी सांगितले.

लखनौ येथे समाजवादी पक्षाच्या कार्यालयाबाहेर  अखिलेश यादव व  शिवपाल यादव यांच्या समर्थकांमध्ये हाणामारी झाली.
लखनौ येथे समाजवादी पक्षाच्या कार्यालयाबाहेर  अखिलेश यादव व  शिवपाल यादव यांच्या समर्थकांमध्ये हाणामारी झाली.

शिवपाल-अखिलेश वाद

नवा पक्ष काढणार असल्याच्या अफवांचे खंडन करून, मुलायमसिंह यांची इच्छा असल्यास मुख्यमंत्रिपद सोडण्यास तयार असल्याचे अखिलेश यांनी सांगितले. वडील व काका यांच्या उपस्थितीत बैठकीत बोलताना त्यांना रडू कोसळले.  वडील हेच माझे गुरू असल्याचे त्यांनी सांगितले. पुतण्यावर टीका करताना शिवपाल यादव यांनी विधानसभा निवडणुका लढवण्यासाठी आपण नवा पक्ष काढणार असल्याचे अखिलेश यांनी मला सांगितल्याने वाद भडकला. उत्तर प्रदेशची सूत्रे हाती घ्यावीत, असे आवाहन त्यांनी मुलायम सिंह यादव यांना  केले. शिवपाल आणि अखिलेश यांनी व्यासपीठावरच एकमेकांवर आरोप केले.

समर्थकांमध्ये संघर्ष :  बैठकीच्या ठिकाणी तसेच बाहेर पक्षातील कार्यकर्त्यांची हाणामारी झाली. यावेळी प्रदेशाध्यक्ष असलेले शिवपाल यादव तसेच अखिलेश समर्थकांनी घोषणाबाजी केली.

अमरसिंह आणि शिवपाल यांच्याविरुद्ध मी काहीही खपवून घेणार नाही. अमर सिंग यांनी मला तुरुंगात जाण्यापासून वाचवले. केवळ लाल टोपी घातल्याने कुणी समाजवादी होत नाही. काही मंत्री केवळ खुशमस्करे आहेत.

-मुलायमसिंह यादव, समाजवादी पक्षाचे सर्वेसर्वा