अखिलेश यादव यांना मुख्यमंत्रीपदावरुन हटवणार नाही असे स्पष्टीकरण समाजवादी पक्षाचे सर्वेसर्वा मुलायमसिंह यांनी दिले आहे. तर दुसरीकडे शिवपाल यादव आणि अमरसिंह यांची साथ सोडणार नाही असेदेखील मुलायमसिंह यांनी अखिलेश यादव यांना ठणकावून सांगितले आहे. विशेष म्हणजे मुलायमसिंह यांनी काका – पुतण्याची गळाभेट घडवल्यानंतर दोन्ही नेत्यांमध्ये धक्काबुक्कीदेखील झाल्याचे सांगितले जात आहे.

लखनऊमध्ये सोमवारी समाजवादी पक्षाची बैठक पार पडली. मुख्यमंत्री अखिलेश यादव आणि शिवपाल यादव यांच्यातील संघर्षाच्या पार्श्वभूमीवर ही बैठक पार पडली. अखिलेश यादव आणि शिवपाल यादव यांच्या भाषणानंतर समाजवादी पक्षाचे सर्वेसर्वा मुलायमसिंह यांनी संबोधित केले. कुटुंबातील कलहामुळे मी व्यथित झालो आहे. पण मला कोणी कमकुवत समजू नका असे मुलायमसिंह यांनी सांगितले. आपल्या पक्षातील उणीवांवर मात करण्याऐवजी आपण एकमेकांशी भांडत आहोत हे दुर्दैवी असल्याची खंत त्यांनी व्यक्त केली. जो टीका सहन करु शकत नाही तो कधीच मोठा नेता बनत नाही असे सूचक वक्तव्य करत त्यांनी अखिलेश यादव यांच्यावर निशाणा साधला. गुंडांना पक्षात स्थान दिले जात आहे, तुमच्या हाती सत्ता आली आणि आता त्याची हवा तुमच्या डोक्यात पोहोचली आहे असे खडे बोलही त्यांनी अखिलेश यादव यांना सुनावलेत.  तरुणाई माझ्यासोबत नाही असा विचार करु नका. शिवपाल यादव हे जनतेचे नेते आहेत असेही मुलायमसिंह म्हणालेत.

अमरसिंहाचे कौतुक करताना मुलायमसिंह म्हणाले, अमरसिंह यांनी मला वाचवले आहेत. मी शिवपाल आणि अमरसिंहाना कधीच सोडू शकत नाही असेही मुलायमसिंह यांनी नमूद केले. भाषणानंतर मुलायमसिंह यांनी मुलगा अखिलेश यादव यांना थांबवले. शिवपाल हे तुझे काका आहेत असे सांगत त्यांनी शिवपाल यांच्यासोबत गळाभेटही घडवली. पण यानंतर शिवपाल आणि अखिलेश यांच्यात वाद सुरु झाला आणि हे प्रकरण धक्काबुक्कीपर्यंत पोहोचले. यानंतर ही बैठक आटोपती घेण्यात आली.  समाजवादी पक्षात सध्या अखिलेश यादव आणि शिवपाल यादव असे दोन गट पडले आहेत. शिवपाल यादव हे मुलायमसिंह यांचे बंधू आहेत.  तर दुसरीकडे मुलायमसिंह हेदेखील मुलगा अखिलेश यादव याच्या कार्यपद्धतीवर नाराज आहेत.