जातीयवादी पक्षांविरोधात महाआघाडी करण्याचा निर्णयाला बिहारमध्येच खो बसला असून, समाजवादी पक्षाने बिहारमधील विधानसभा निवडणूक स्वतंत्रपणे लढण्याचा निर्णय गुरुवारी जाहीर केला. भाजपविरोधात जनता दल युनायटेड, कॉंग्रेस आणि राष्ट्रीय जनता दलाने आघाडी केली आहे. मात्र, ही आघाडी करताना आपल्याला विचारात घेण्यात आले नाही आणि कोणतीही चर्चा करण्याअगोदरच आघाडीतील जागावाटप जाहीर करण्यात आल्यामुळे समाजवादी पक्षाने स्वतंत्रपणे निवडणूक लढविण्याचा निर्णय घेतला.
याबद्दल पक्षाचे नेते रामगोपाल यादव म्हणाले, जागावाटप जाहीर करण्यापूर्वी आमच्याशी कोणतीच चर्चा न करण्यात आल्यामुळे आम्हाला दुःख वाटले. त्यामुळेच आम्ही स्वतंत्रपणे निवडणूक लढविण्याचा निर्णय घेतला.
दरम्यान, स्वतंत्रपणे निवडणूक लढविताना इतर राजकीय पक्षांचा पाठिंबा घेण्याबद्दलही सध्या चर्चा सुरू असून, त्याबद्दल लवकरच माहिती देण्यात येईल, असे पक्षातील सूत्रांनी सांगितले.