समाजवादी पक्षातील कौटुंबिक कलह आता शिगेला पोहोचला असून सोमवारी सकाळी शिवपाल यादव आणि अखिलेश यादव यांचे समर्थक भिडले आहेत. जमावाला पांगवण्यासाठी पोलिसांना बळाचा वापर करावा लागला आहे. तर दुसरीकडे अखिलेश यादव यांनी नवीन पक्षाची स्थापना करणार नाही असे जाहीर केले आहे.

उत्तरप्रदेशमधील निवडणुकीला आता काही महिनेच शिल्लक असताना सत्ताधारी समाजवादी पक्षातील कौटुंबिक कलह उफाळून आला आहे. मुख्यमंत्री अखिलेश यादव यांनी काका शिवपाल यादव यांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी केली आहे. तर अखिलेश यादव यांना शह देण्यासाठी शिवपाल यादव यांनी अखिलेश यादव यांचे समर्थक रामगोपाल यादव यांना पक्षातून सहा महिन्यांसाठी डच्चू दिला आहे. ऐन निवडणुकीच्या तोंडावर हे मतभेद वाढत असल्याने समाजवादीची नाचक्की झाली आहे. रविवारी झालेल्या घडामोडीनंतर सोमवारी मुलायमसिंह यांनी पक्षातील वरिष्ठ नेते आणि पदाधिका-यांची बैठक बोलावली आहे. लखनऊमध्ये ही पक्ष कार्यालयात ही बैठक होणार असून या बैठकीसाठी सकाळपासून कार्यकर्त्यांची कार्यालयाबाहेर गर्दी वाढली आहे. शिवपाल आणि अखिलेश समर्थकांची घोषणाबाजी करण्यात आली. या बैठकीत अखिलेश यादव यांनीदेखील भाषण केले. भाषणादरम्यान अखिलेश यादव भावूक झाले होते.  मी नवीन पक्षाची स्थापना करणार नाही असे त्यांनी स्पष्ट केले. मुलायमसिंह यांनी राजीनामा मागितला असता तर मी तात्काळ दिला असता असे सांगत अखिलेश यादव यांनी अंतिम निर्णय वडील म्हणजेच मुलायमसिंहच घेतील असे त्यांनी अप्रत्यक्षपणे सांगितले. नेताजींच्या (मुलायमसिंह) पक्षाविरोधात कोण षडयंत्र रचत असेल तर त्यांच्यावर मी कारवाई करणारच असे अखिलेश यादव यांनी सांगितले.

समाजवादीतील या गृहकलहामुळे लखनऊमधील वातावरण तणावपूर्ण बनले आहे. आम्ही सध्या विधानसभा निवडणुकीची तयारी करत असून हे एक दिवस होणारच होते याची कल्पना होती अशी प्रतिक्रिया शिवपाल यादव यांनी दिली आहे. तर अखिलेश यादव हे नवीन पक्ष स्थापन करणार होते असा आरोप शिवपाल यादव यांनी केला आहे.

Live Updates
15:55 (IST) 24 Oct 2016
14:33 (IST) 24 Oct 2016
14:32 (IST) 24 Oct 2016
समाजवादी पक्षात सुरु असलेल्या वादावर प्रतिक्रिया देण्यास अमरसिंह यांचा नकार.
14:23 (IST) 24 Oct 2016
मुलायम सिंह, अखिलेश यादव आणि शिवपाल यादव यांच्यातील बैठक संपली.
13:30 (IST) 24 Oct 2016
मुख्यमंत्री अखिलेश यादव मुलायमसिंह यांची भेट घेण्यासाठी त्यांच्या निवासस्थानी दाखल.
13:03 (IST) 24 Oct 2016
अखिलेश यादव यांना मुख्यमंत्रीपदावरुन हटवणार नाही - मुलायमसिंह यादव
13:02 (IST) 24 Oct 2016
गळाभेटीनंतर अखिलेश आणि शिवपाल यादव यांच्यातही शाब्दिक चकमक.
13:01 (IST) 24 Oct 2016
मुलायमसिंह यादव यांनी अखिलेश यांना काका शिवपाल यादव यांची गळाभेट घ्यायला सांगितले.
13:00 (IST) 24 Oct 2016
तुमचा मंत्री खोटं बोलतोय - संतापाच्या भरात मुलायमसिंह यांनी अखिलेश यादव यांना सुनावले
12:59 (IST) 24 Oct 2016
मुलायमसिंह यादव आणि अखिलेश यादव यांच्यात खडाजंगी.
11:40 (IST) 24 Oct 2016
मी अजून कमकुवत झालेलो नाही - मुलायमसिंह यादव
11:40 (IST) 24 Oct 2016
आपण आपल्या उणीवांवर मात करण्याऐवजी एकमेकांशी भांडत आहोत - मुलायमसिंह यादव
11:33 (IST) 24 Oct 2016
आपण सध्या कठीण परिस्थितीचा सामना करत आहोत - मुलायमसिंह यादव
11:32 (IST) 24 Oct 2016
मी तरुणाईचा नेहमीच सन्मान केला आहे - मुलायमसिंह यादव
11:27 (IST) 24 Oct 2016
कौटुंबिक कलह बघून मी व्यथित झालो - मुलायमसिंह यादव
11:19 (IST) 24 Oct 2016
२०१७ च्या निवडणुकीत समाजवादी पक्षाला विजय मिळावा यासाठी प्रत्येकाने काम करावे - शिवपाल यादव
11:18 (IST) 24 Oct 2016
अखिलेश यादव नवीन पक्ष स्थापन करणार होते - शिवपाल यादव यांचा आरोप
11:12 (IST) 24 Oct 2016
मुलायमसिंह यांनी अथक मेहनत घेऊन हा पक्ष उभा केला आहे - शिवपाल यादव
11:05 (IST) 24 Oct 2016
पक्षात बेशिस्तपणा खपवून घेणार नाही, नेताजींमुळेच आज पक्षाने ही उंची गाठली होती - शिवपाल यादव
11:03 (IST) 24 Oct 2016
नोव्हेंबरअखेरपर्यंत मी मुख्यमंत्रीपदी नसेन हे अमरसिंह यांनी सांगितल्याने मी निराश झालो - अखिलेश यादव
11:02 (IST) 24 Oct 2016
नेताजींनी (मुलायमसिंह) राजीनामा मागितला तर तात्काळ राजीनामा देणार - अखिलेश यादव