सन २००७ मध्ये समझोता एक्स्प्रेसमध्ये बॉम्ब ठेवल्याप्रकरणी मागील महिन्यात अटक करण्यात आलेला आरोपी राजेंदर चौधरी याने आपण एका मुसलमान माणसाला उज्जैन येथे मारले असल्याचे कबूल केले आहे, ज्याच्यावर हिंदू मुलींना घेऊन अश्लिल चित्रपट तयार करत असल्याचा संशय होता.
चौधरीच्या या जवाबाचा आधार घेत, या गुन्ह्यात सहभागी असलेल्या सुदिप उपाध्याय(३५) याला मध्य प्रदेश पोलिसांनी अटक केली आहे.
समझोता एक्स्प्रेस, मालेगाव, अजमेर आणि मक्का मसजिद बॉम्बस्फोट प्रकरणी वॉन्टेंड असेलेले हिंदू दहशतवादी गटाचे रामजी कलसंग्रा यांच्या सांगण्यावरून २७ जुलै २००६ रोजी चौधरी आणि उपाध्याय यांनी मुजीब लाला (३५) याला गोळ्या घातल्याची घटना घडली होती. लालाचे व्हिडिओ टेप भाड्याने देण्याचे आणि विकण्याचे दुकान होते तसेच तो लहान-मोठी कर्जेही देत असे.    
आय.जी.उपेंद्र जैन हे उज्जैनहून इंडियन एक्स्प्रेसशी बोलताना म्हणाले की, ‘ही केस गेली अनेक वर्षे न सोडवताच पडून आहे. या खुलाशानंतर, आम्ही उपाध्यायला अटक केली आहे आणि आम्ही लवकरच चौधरीच्या पोलिस कोठडीची मागणी करणार आहोत’.
पोलिसांच्या म्हणण्यानुसार ज्या दिवशी ही घटना घडली, त्यावेळी लाला हा आपल्या दुचाकीवर होता आणि आरोपींनी मोटरसायकलवरून येऊन त्याला गोळ्या झाडल्या. कलसांग्रा याने यासाठी हत्यारे पुरवल्याचे तपासात उघड झाले आहे.
उपाध्याचे इंदौरजवळ जंतूनाशकांचे दुकान आहे, तो २००० मध्ये राष्ट्रीय स्वसंसेवक संघाचे कार्यकर्ते सुनिल जोशी यांच्या संपर्कात आला आणि तो नेहमी राष्ट्रीय स्वसंसेवक संघाच्या शाखांना हजेरी लावत असे.