समझौता एक्स्प्रेस बॉम्बस्फोटातील आरोपी स्वामी असिमानंद यांना गुरुवारी पंजाब आणि हरियाणा उच्च न्यायालयाकडून जामीन मंजूर करण्यात आला. असिमानंद यांच्या वकिलांकडून जामीनासाठी याचिका दाखल करण्यात आली होती. त्यावर न्या. एस. एस. सरोन आणि न्या. लिझा गिल यांच्या खंडपीठाने हा निर्णय दिला.
असिमानंद यांना राष्ट्रीय तपास संस्थेने (एनआयए) २६ डिसेंबर २०१२ रोजी अटक केली होती. त्यांच्याविरुद्ध पानिपतजवळ झालेल्या समझौता बॉम्बस्फोटप्रकरणी २६ जुलै २००७ रोजी गु्न्हा दाखल करण्यात आला. असिमानंद यांच्याशिवाय इतर तीन जणांवर हत्येचा आणि देशद्रोहाचा आरोप ठेवण्यात आला आहे. भारतीय दंडविधान संहितेच्या कलम १२०-ब, ३०७, १२४-ए, ४३८ आणि ४४० नुसार या सर्वांवर आरोप ठेवण्यात आले आहेत.