सॅमसंगच्या गॅलक्सी एस ६ आणि एस ६ एज या दोन हॅण्डसेट मॉडेल्सना मिळणाऱया प्रतिसादामुळे कंपनीच्या जानेवारी ते मार्च या पहिल्या तिमाहीच्या नफ्यात मोठी वाढ झाली असून, एप्रिल ते जून या दुसऱया तिमाहीतही ही वाढ कायम राहिल, असा अंदाज वर्तविण्यात आला आहे. पहिल्या तिमाहीत सॅमसंगने स्मार्टफोन उत्पादनात अॅपललाही मागे टाकले असल्याचे मत विपणन क्षेत्रातील विश्लेषकांनी वर्तविले. सॅमसंगसाठी ही दिलासादायक घटना आहे.
गेल्या काही वर्षांमध्ये सॅमसंगने आपल्या हॅण्डसेट उत्पादनांच्या डिझाईनमध्ये फार मोठे बदल केले नव्हते. मात्र, एस ६ आणि एस ६ एज या दोन मॉडेल्सच्या निमित्ताने कंपनीने आता स्मार्टफोनच्या डिझाईनकडे विशेष लक्ष देण्यास सुरुवात केली आहे.
गॅलक्सी एस ६ ची विक्री अपेक्षेप्रमाणे सुरू आहे. त्याचवेळी गॅलक्सी एस ६ एजची मागणी अपेक्षेपेक्षा चांगली आहे, असे सॅमसंगचे उपाध्यक्ष पार्क जिन यंग यांनी सांगितले. जानेवारी ते मार्च या पहिल्या तिमाहीमध्ये कंपनीला ५.६४ अब्ज डॉलरचा फायदा झाला. गेल्या तीन तिमाहींच्या तुलनेत हा नफा सर्वाधिक आहे. एप्रिल ते जून या दुसऱया तिमाहीमध्ये फायद्याचा आलेख चढताच राहिल, अशी कंपनीला अपेक्षा आहे. कारण या तिमाहीमध्ये धातूच्या साह्याने तयार केलेले गॅलक्सी एस ६ मॉडेल नव्या डिझाईनसह बाजारात येत आहे. त्यालाही ग्राहकांचा चांगला प्रतिसाद लाभेल, अशी कंपनीला अपेक्षा आहे.