ग्राहकांना उच्च दर्जाचा सेवा अनुभव देण्यासाठी कोरियाची सॅमसंग कंपनी त्यांची सर्व उत्पादने येत्या पाच वर्षांत एकमेकांना जोडणार आहे. या आंतरजोडणीवर आधारित उपकरण तंत्रज्ञानास इंटरनेट ऑफ थिंग्ज (आयओटी) असे नाव देण्यात आले आहे.
इंटरनेट ऑफ थिंग्ज हा सॅमसंग इलेक्ट्रॉनिक्सचा परवलीचा शब्द असून प्रगत संवेदकांच्या मदतीने मानवाच्या सेवा समस्यांवर अचूक उत्तरे शोधणे हा त्यामागचा हेतू आहे. आयओटी आता झेप घेण्याच्या मार्गावर आहे आता ती विज्ञान काल्पनिका नाही, असे सॅमसंग इलेक्ट्रॉनिक्सचे मुख्य कार्यकारी अधिकारी पी. के. यून यांनी येथील इलेक्ट्रॉनिक शोमध्ये सांगितले. जर ग्राहकाने घरी पोहोचल्यानंतर इयर फोन उचलला तर आयओटीच्या मदतीने आपोआप संगीत सुरू होईल त्यात होम स्पीकर सिस्टीमचा वापर असेल. सॅमसंगची आयओटी साधने ही खुली असतील दुसऱ्या आयओटी साधनांच्या संवेदकांनाही ती स्वीकारतील. अशा खुलेपणाशिवाय आयओटीला अर्थ नाही कारण नाहीतर ती एकत्र चालू शकणार नाहीत. २०१७ पर्यंत सॅमसंग टीव्ही तंत्रज्ञानात त्याचा वापर केला जाईल व पाच वर्षांत सॅमसंग हार्डवेअर, टीव्ही, रेफ्रीजरेटर, वॉशिंग मशीन, मायक्रोवेव्ह, डाटा स्टोरेजेस व स्मार्ट फोन ही आयओटी तंत्रज्ञानाने सज्ज असतील असे त्यांनी सांगितले. येत्या पाच वर्षांत हे तंत्रज्ञान तयार केले जाणार असून त्यात यंत्रांना मानवी आदेशही आवश्यक असणार नाहीत तर संवेदकांच्या मदतीने ते काम करतील.
सॅमसंगची हाय डेफिनिशन टीव्ही मालिका
लास वेगास येथील तंत्रज्ञान मेळ्यात सॅमसंगने एसयूएचडी प्रकारच्या टीव्हींची मालिका सादर केली. येत्या काही महिन्यात हे टीव्ही भारतीय बाजारपेठेत येणार आहे. अल्ट्रा हाय डेफिनिशन टीव्ही हे चार के रेझोल्यूशन (विवर्तनाचे) असून ते टायझेन या ऑपरेटिंग सिस्टीमवर चालतील. यात नेटफ्लिक्स, कॉमकास्ट व यूटय़ब एकत्र चालवता येतील. ४८ ते ८८ इंची पडदा असलेले हे टीव्ही असतील त्यांची किंमत मात्र सांगण्यात आलेली नाही. ओएलइडी टीव्हीचे ग्राहक असलेल्यांना हा नवीन पर्याय असून त्यात नॅनो क्रिस्टल सेमीकंडक्टर हे विविध रंगांचा प्रकाश प्रसारित करतील. सॅमसंगने ट्वेंटीथ सेंच्युरी फॉक्स या कंपनीशी करार केला असून फॉक्स इनोव्हेशन लॅबच्या एक्सोडस चित्रपटात वापरलेल्या एसयूएचडी तंत्रज्ञानाचा वापर टीव्हीत केला जाणार आहे.