निवडणुकीपूर्वी नरेंद्र मोदी यांच्यावर घणाघाती टीका करणारे शरद पवार मतमोजणीनंतर एकदम कसे काय पलटले, असा प्रश्न उपस्थित करीत कॉंग्रेस नेते संदीप दीक्षित यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेसवर सोमवारी हल्ला केला. मतमोजणीनंतर अवघ्या सहा तासांत असे काय घडले की शरद पवार यांच्या पक्षाला भाजपला बाहेरून पाठिंबा द्यावासा वाटू लागला, याचे उत्तर त्यांनी दिले पाहिजे, असे दीक्षित यांनी म्हटले आहे.
भाजप राज्यात सर्वात मोठा पक्ष ठरल्यानंतर राष्ट्रवादी कॉंग्रेसने त्यांना सरकार स्थापन करण्यासाठी बाहेरून पाठिंबा देण्याची तयारी रविवारी दर्शविली. राष्ट्रवादीचे नेते प्रफुल्ल पटेल यांनी आपला पक्ष भाजपला बिनशर्त पाठिंबा देण्यास तयार असल्याचे पत्रकारांना सांगितले. मात्र, भाजपकडून कोणतीही मागणी झालेली नसताना आणि निवडणुकीत हे दोन्ही पक्ष एकमेकांविरोधात लढले असताना राष्ट्रवादीने भाजपला पाठिंबा देण्याचा निर्णय घेतल्यामुळे सर्वांच्याच भुवया उंचावल्या. या पार्श्वभूमीवर कॉंग्रेसने सोमवारी राष्ट्रवादीवर टीका केली.
संदीप दीक्षित म्हणाले, निवडणुकीच्या प्रचारात शरद पवार यांनी नरेंद्र मोदींवर जोरदार टीका केली होती. मोदींच्या धार्मिक राजकारणावरही शरद पवार यांनी याआधी हल्ला चढविला आहे. मग या स्थितीत मतमोजणीनंतर अवघ्या सहा तासांत त्यांनी एकदम पलटी का मारली? राज्यात स्थिर सरकार आले पाहिजे, असे राष्ट्रवादीचे नेते सांगत आहेत. मात्र, स्थिर सरकार याचा अर्थ काय, असाही प्रश्न त्यांनी उपस्थित केला.
राष्ट्रवादीने आमच्यासोबतची आघाडी तोडली नसती, तर आमची मते वाढली असती आणि आमच्या दोघांचे सरकार पुन्हा सत्तेत आले असते, असाही दावा त्यांनी यावेळी केला.