जागल्याची भूमिका पार पाडणारे भारतीय वन अधिकारी व अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थेच्या मुख्य दक्षता अधिकारी पदावरून बदली करण्यात आलेले संजीव चतुर्वेदी व ‘गूंज’ या स्वयंसेवी संस्थेच्या अंशू गुप्ता या दोन भारतीयांना रॅमन मॅगसेसे पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. इतर तिघांमध्ये लाओसचे कोमली चॅनथावोंग, फिलिपिन्सचे लिगाया फर्नाडो अमिलबंगसा, म्यानमारचे क्या थू यांचा समावेश आहे. रॅमन मॅगसेसे पुरस्कार फाउंडेशनने ही घोषणा केली.
चतुर्वेदी यांना ‘उदयोन्मुख नेतृत्व पुरस्कार’ मिळालेला असून सध्या ते अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थेत उप सचिव आहेत. चतुर्वेदी यांना गेल्या वर्षी ऑगस्टमध्ये अखिल भारतीय आयुर्विज्ञान केंद्राच्या दक्षता अधिकारी पदावरून त्यांची बदली, त्यांनी संस्थेतील गैरप्रकार बाहेर काढल्याने केली होती. फाउंडेशनने म्हटले आहे की, चतुर्वेदी यांनी धैर्य दाखवून सार्वजनिक क्षेत्रातील भ्रष्टाचाराला विरोध केला आहे, व्यवस्था सुधारण्यासाठी त्यांनी प्रयत्न केले. अंशू गुप्ता यांनी १९९९ मध्ये कंपनीतील नोकरी सोडून ‘गॅूंज’ ही संस्था स्थापन केली. त्यांनी भारतातील दातृत्वाच्या संस्कृतीला आणखी पुढे नेले. कपडे हा गरिबांसाठी स्थायी विकासाचा स्रोत आहे असे त्यांचे म्हणणे आहे. फिलिपिन्सचे राष्ट्राध्यक्ष रॅमन मॅगसेसे यांच्या स्मरणार्थ हा पुरस्कार १९५७ पासून सुरू करण्यात आला. आतापर्यंत दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल, माजी आयपीएस अधिकारी किरण बेदी, सामाजिक कार्यकर्त्यां अरूणा रॉय यांच्यासह काही भारतीयांना हा पुरस्कार मिळाला आहे.
पंतप्रधान कार्यालयाच्या कारभारावर चतुर्वेदी नाराज
पीटीआय, नवी दिल्ली- मॅगसेसे पुरस्कार विजेते संजीव चतुर्वेदी यांनी पंतप्रधान कार्यालयाच्या कारभाराबद्दल नाराजी व्यक्त केली आहे. स्वतंत्र न्यायव्यवस्थेमुळेच आपला टिकाव लागला, असेही चतुर्वेदी यांनी म्हटले आहे. भ्रष्ट अधिकाऱ्यांची कोणत्याही स्थितीत गय करू नये मात्र प्रामाणिक अधिकाऱ्यांना विनाकारण त्रास होऊ नये, पंतप्रधान कार्यालयाच्या कारभाराबद्दल आपण नाराज आहोत. अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थेतील भ्रष्टाचार निपटून काढण्यासाठी प्रसंगी आपण वैयक्तिक धोकाही पत्करला, असेही ते म्हणाले.
भष्टाचाराच्या अनेक प्रकरणांमध्ये ज्येष्ठ अधिकारी गुंतले होते त्यांच्याविरुद्ध आपण कारवाई केली. ‘ना खाऊंगा, ना खाने दूंगा’ या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या घोषणेपासून आपण प्रेरणा घेतली, मात्र अपयशी ठरलो, असेही चतुर्वदी म्हणाले.