माजी अर्थमंत्री आणि काँग्रेसचे दिग्गज नेते पी. चिदंबरम यांच्या पत्नी नलिनी चिदंबरम यांची शारदा चिट फंड घोटाळा प्रकरणी सीबीआयने चौकशी केली आहे. सर्वोच्च न्यायालयामधील वकिली करत असलेल्या नलिनी यांची शनिवारी शारदा उद्योगसमूहातर्फे त्यांना देण्यात आलेल्या कायदेशीर मानधनासंदर्भात ही चौकशी करण्यात आली.
पश्चिम बंगालमधील शारदा ग्रुपचे अध्यक्ष सुदिप्त सेन यांनी दावा केला होता, की त्यांनी काँग्रेस नेते मतंगसिंह यांची घटस्फोटीत पत्नी मनोरंजना सिंह यांच्या सांगण्यावरुन नलिनी चिदंबरम यांना न्यायालयात बाजू मांडण्यासाठी नियुक्त करण्यात आले होते. याशिवाय, सेन यांनी शारदाकडून नलिनी यांना कायदेशीर मानधन म्हणून १ कोटी रुपये दिले गेल्याचाही उल्लेख सीबीआयला गेल्या वर्षी लिहिलेल्या पत्रामध्ये केला होता.  दरम्यान, नलिनी चिदंबरम यांच्या कार्यालयाने सीबीआयमार्फत त्यांची चौकशी झाल्याचे वृत्त फेटाळून लावले आहे. सीबीआयने केवळ शारदाने ईशान्य भारतामधील एक वृत्तवाहिनी विकत घेण्यासंदर्भातील कायदेशीर सल्लामसलत असणारा ७० पानी अहवाल कार्यालयामधून मिळवला असल्याचा दावा चिदंबरम यांच्यातर्फे करण्यात आला आहे