आसामचे १४वे मुख्यमंत्री सर्वानंद सोनोवाल यांची ग्वाही

आसामचे १४ वे मुख्यमंत्री म्हणून मंगळवारी सर्वानंद सोनोवाल यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपचे अध्यक्ष अमित शहा यांच्या उपस्थितीत शपथ घेतली. बेकायदेशीर परदेशी पर्यटक आणि भ्रष्टाचारमुक्त राज्य निर्माण करण्यासाठी आपले सरकार काम करील, अशी ग्वाही आसामचे नवे मुख्यमंत्री सर्वानंद सोनोवाल यांनी मंगळवारी दिली.

आसामचे राज्यपाल पी. बी. आचार्य यांनी सोनोवाल यांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली. आसामचे पहिले भाजपचे ते मुख्यमंत्री झाले आहेत. आसामी भाषेत त्यांनी शपथ घेतली. सोनोवाल यांच्यासह १० मंत्र्यांनी शपथ घेतली असून त्यामध्ये आसाम गण परिषद आणि बोडो पीपल्स फ्रण्ट या आघाडीतील पक्षांचा समावेश आहे.

सोनोवाल यांच्यासह हिमंत विश्व शर्मा, चंद्रमोहन पोटोवारी, रणजित दत्ता, परिमल शुक्लवैद्य, पल्लब लोचन दास आणि नवकुमार डोले (सर्व भाजप) यांनी शपथ घेतली. तर अतुल बोरा (कनिष्ठ) आणि केशव महन्त (आसाम गण परिषद) यांनी आणि प्रमिला राणी ब्रह्मा आणि रिहान दाइमारी (बोडो पीपल्स फ्रण्ट) यांनी शपथ घेतली.

या समारंभाला मावळते मुख्यमंत्री तरुण गोगोई हजर होते. त्याचप्रमाणे भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी, राजनाथ सिंह, नितीन गडकरी, सुरेश प्रभू, रामविलास पासवान, व्यंकय्या नायडू, निर्मला सीतारामन, राजीव प्रताप रूडी, किरेन रिजिजू आदी मंत्री हजर होते. त्याचप्रमाणे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान, राजस्थानच्या मुख्यमंत्री वसुंधराराजे, गोव्याचे मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर, हरयाणाचे मुख्यमंत्री मनोहरलाल खट्टर हेही उपस्थित होते.