पाकिस्तानी पंतप्रधान नवाझ शरीफ यांचे परराष्ट्र सल्लागार सरताज अझीझ यांना सुवर्ण मंदिरातील प्रवेश नाकारण्यात आला आहे. सरताज अझीझ यांना सुवर्ण मंदिरात जाण्याची परवानगी नाकारली गेली आहे. सुरक्षेच्या कारणास्तव सरताज अझीझ यांना सुवर्ण मंदिरात प्रवेश देण्यात आला नसल्याचे सूत्रांनी सांगितले आहे.

कोणत्याही प्रकारचा अनुचित प्रकार घडू नये, यासाठी सरताज अझीझ यांना सुवर्ण मंदिरात जाऊ न देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. सुवर्ण मंदिरातूल प्रवेश नाकारण्यात आल्यानंतर सरताज अझीझ थेट इस्लामाबादला निघून गेले. अझीझ यांना पत्रकार परिषद घेण्याची परवानगीही देण्यात आली नाही, असे वृत्त पाकिस्तानी माध्यमांनी दिले आहे. भारताकडून अजीज यांचा अपमान करण्यात आला आहे, असे वृत्तांकन पाकिस्तानी माध्यमांकडून केले जात आहे. अझीझ हार्ट ऑफ एशिया परिषदेसाठी भारतात आले होते.

हार्ट ऑफ एशिया परिषदेत सरताज अझीझ यांनी भारत-पाकिस्तान दरम्यानच्या तणावाचा मुद्दा उपस्थित केला. ‘सीमेवर तणावपूर्ण परिस्थिती असतानाही परिषदेत सहभागी होणे, हे आमच्या शांतीपूर्ण भूमिकेचे दर्शक आहे. अफगाणिस्तानमधील स्थैर्यासाठी आम्ही कटिबद्ध आहेत,’ असे सरताज अझीझ यांनी हार्ट ऑफ एशिया परिषदेत म्हटले. ‘नोव्हेंबरमध्ये इस्लामाबादमधील दक्षेस संमेलन रद्द करण्यात आले होते. त्यामुळे आशियाई देशांच्या सहकार्याच्या भूमिकेला धक्का बसला. अफगाणिस्तानमधील सुरक्षेची स्थिती अतिशय गंभीर आहे. हिंसक घटनांमध्ये मोठी वाढ झाली आहे. त्यासाठी एका देशाला जबाबदार धरणे अतिशय सोपे आहे,’ असेही अझीझ यांनी म्हटले.

‘शेजारी राष्ट्रांमध्ये सहकार्य असायला हवे. त्यासाठीच दक्षेस शिखर संमेलनाचे नोव्हेंबरमध्ये आयोजन करण्यात आले होते. मात्र इस्लामाबादमधील हे संमेलन रद्द करण्यात आल्याने सहकार्याची भावना कमी झाली,’ असे अझीझ यांनी हार्ट ऑफ एशिया परिषदेत बोलताना म्हटले. पाकिस्तानात दहशतवाद्यांना आश्रय आणि प्रोत्साहन देण्यात येत असल्याने भारताने दक्षेस संमेलनात सहभाग घेतला नव्हता. भारताने दक्षेस संमेलनात सहभागी न होण्याची भूमिका घेतल्यानंतर अफगाणिस्तानसह अन्य देशांनीही याच कारणाच्या आधारे संमेलनात सहभागी न होण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे आठ सदस्य देशांचे दक्षेस संमेलन करण्यात आले होते.