सौदी अरेबियाच्या लढाऊ विमानांनी येमेनचे अध्यक्ष अबेद्राबो मनसौर हादी यांच्या समर्थनार्थ हुथी शिया बंडखोरांवर हल्ले केले. हादी हे अरब शिखर बैठकीसाठी येत असताना सौदी अरेबियाने हा हल्ला केला. सौदी अरेबियाचा हस्तक्षेप अयोग्य असल्याचा इशारा इराणने दिला आहे. सौदी अरेबियाच्या नेतृत्वाखाली करण्यात आलेल्या हल्ल्यात २४ तासात ३९ नागरिक ठार झाले आहेत असे आरोग्य मंत्रालयाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. दरम्यान, येमेनमध्ये अडकलेल्या भारतीयांना सुरक्षितरीत्या मायदेशात परत आणण्यासाठी केंद्र सरकार दोन जहाजे पाठवणार आहे.
सनाच्या उत्तरकेडील भागात बाराजण ठार झाले असून तो निवासी भाग आहे. सध्या त्या भागात बंडखोरांचे नियंत्रण आहे. प्रत्यक्ष घटनादर्शीनी दिलेल्या माहितीनुसार लढाऊ विमानांनी अल समा तळावर हल्ला केला. माजी कमांडर अहमद अली सलेह यांच्या आदेशानुसार या तळावरून लष्कर काम करीत होते. सलेह हे पदच्युत अध्यक्ष अली अब्दुल्ला सलेह यांचे पुत्र आहेत. त्यांनी अध्यक्ष अबेद्राबो मनसौर हादी यांच्या विरोधात हुथी बंडखोरांशी साटेलोटे केले आहे. आज पहाटे दक्षिण सना येथे तीन हवाई हल्ले केले.
हे ठिकाण गेल्या महिन्यात बंडखोरांनी ताब्यात घेतले होते. पूर्वेकडील मारिब येथेही हल्ले करण्यात आले. यावेळी शस्त्रागारांवरही हल्ले करण्यात आले. सनाच्या दक्षिणेकडे एका छावणीवर करण्यात आलेल्या हल्ल्यात काही लोक ठार झाल्याचे समजते पण त्या माहितीची खातरजमा होऊ शकलेली नाही. दरम्यान अमेरिकेने रडार असलेली विमाने व फेरइंधन भरण्याची व्यवस्था उपलब्ध करून देईल. सौदी अरेबियाच्या नेतृत्वाखालील आघाडीला गुप्तचर माहिती, रसद पुरवठाही करण्यात येईल असे व्हाईट हाऊसने सूचित केले.