सौदी अरेबियाच्या नेतृत्वाखालील आघाडीने येमेनमध्ये केलेल्या हल्ल्यात क्लस्टर बॉम्बचा वापर केला आहे, असा दावा हय़ूमन राईट्स वॉच या संस्थेने म्हटले आहे. क्लस्टर बॉम्बचा वापर हा घातक असतो, त्यामुळे नागरिकांवर दीर्घकाळ घातक परिणाम होईल असा इशारा संस्थेने दिला आहे.
क्लस्टर बॉम्बला अनेक देशांत बंदी असताना सौदी अरेबियाने त्याचा वापर केला आहे. क्लस्टर बॉम्ब हे काही वेळा फुटत नाहीत व सुरुंगासारखे टिकून राहतात, त्यामुळे लोक एकदम मारले जात नाहीत तर नंतर मारले जातात. अमेरिकेने क्लस्टर बॉम्बच्या वापराचे समर्थन केले असून, विशिष्ट लष्करी लक्ष्याच्या बाबतीतच क्लस्टर बॉम्बचा वापर केला जातो तो योग्य आहे. नागरिक जेथे राहात असतील तेथे या प्रकारचे बॉम्ब वापरले जात नाहीत असे अमेरिकेच्या संरक्षण खात्याच्या प्रवक्त्यांनी सांगितले. हय़ूमन राइट्स वॉच या संस्थेने सांगितले, की आम्ही छायाचित्रे, दृश्यफिती व इतर पुराव्यांच्या आधारे क्लस्टर बॉम्ब वापरल्याचे सिद्ध करू शकतो. येमेनमध्ये उत्तर पर्वतराजीतील सदा प्रदेशात हुथी बंडखोरांवर या बॉम्बचा मारा करण्यात आला.
उपग्रहांच्या छायाचित्रांआधारे असे दिसते, की ६०० मीटरच्या जास्त लोकवस्ती असलेल्या भागात क्लस्टर बॉम्ब वापरले आहेत.
क्लस्टर बॉम्बवर २००८ मध्ये ११६ देशांत बंदी आहे, पण सौदी अरेबिया व अमेरिकेत ही बंदी नाही.  हय़ूमन राइट्स वॉच संस्थेचे संचालक स्टीव्ह गूस यांनी सांगितले, की हवाई हल्ल्यात या बॉम्बचा वापर झाल्याने स्थानिक लोक धोक्यात आले आहेत. दरम्यान, सौदी अरेबियाचे प्रवक्ते ब्रिगेडियर जनरल अहमद अल असिरी यांनी क्लस्टर बॉम्ब वापरल्याचा इन्कार केला आहे. अमेरिकेने क्लस्टर बॉम्ब सौदी अरेबिया व संयुक्त अरब अमिरातीला पुरवले असून ते टेक्सट्रॉन सिस्टीम्स कॉर्पोरेशनने तयार केले आहेत. हय़ूमन राइट्स वॉचच्या बातमीचा आम्ही गांभीर्याने विचार करू, असे अमेरिकेच्या अधिकाऱ्याने सांगितले, मात्र कुठल्या प्रकारचे बॉम्ब वापरले हे सांगण्याचे टाळले.

क्लस्टर बॉम्ब
* सौदी अरेबियाने सीबीयू १०५ क्लस्टर बॉम्बचा वापर.
* क्लस्टर बॉम्बमध्ये वीस किलो स्फोटके असतात.
* एकूण ३४ देश या बॉम्बची निर्मिती करतात.
* २००८च्या करारानुसार क्लस्टर बॉम्बला बंदी.