देशांतर्गत जलमार्गामुळे केवळ मालाची आणि प्रवाशांचीच सोय होणार नाही तर त्यामुळे कोळसा वाहतुकीतही दर वर्षी १० हजार कोटी रुपयांची बचत होण्यास मदत होणार आहे, असे जहाजबांधणीमंत्री नितीन गडकरी यांनी येथे सांगितले.

देशातील १११ नद्यांचे राष्ट्रीय जलमार्गात रूपांतर करण्यासंदर्भातील विधेयकाला हिवाळी अधिवेशनात संसदेची मंजुरी मिळेल, असा विश्वासही नितीन गडकरी यांनी व्यक्त केला.देशांतर्गत जलमार्गामुळे मोठय़ा प्रमाणावर बचत होऊन मालाची आणि प्रवाशांची वाहतूक सुलभ होईल. त्याचप्रमाणे कोळशाच्या वाहतुकीतून दर वर्षी १० हजार कोटी रुपयांची बचत होईल, असेही गडकरी म्हणाले. जलमार्गाचा वापर स्वस्त असून ते मालाची वाहतूक करण्याचे पर्यावरणास अनुकूल असे माध्यम आहे, असेही गडकरी म्हणाले.
एक अश्वशक्ती रस्त्यावर १५० किलो, रेल्वेने ५०० किलो तर जलमार्गाने चार हजार किलो मालवाहतूक करू शकते, त्यामुळे संसदेची या विधेयकाला मंजुरी मिळेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.बंदर क्षेत्राची कामगिरी सुधारण्याच्या सूचनाही देण्यात आल्या असून चालू आर्थिक वर्षांत बंदर क्षेत्राला सहा हजार कोटी रुपयांची नफा होईल, अशी अपेक्षा आहे, असेही गडकरी म्हणाले. चारपदरी रस्ते आणि महामार्गाचे आठ पदरी मार्गात रूपांतर करण्यात येणार आहे, असे त्यांनी स्पष्ट केले.