देशभर चर्चेत असलेल्या मध्य प्रदेशातील व्यापम घोटाळ्याशी कथित संबंध असल्याच्या कारणामुळे तेथील राज्यपाल राम नरेश यादव यांना पदावरून दूर करण्यात यावे, यासाठी सर्वोच्च न्यायालयात दाखल झालेल्या याचिकेवर सुनावणी घेण्यास न्यायालयाने सोमवारी होकार दिला. सरन्यायाधीश एच. एल. दत्तू, न्यायमूर्ती अरूण कुमार मिश्रा आणि न्या. अमितवा रॉय यांच्या पीठाने या विषयावर ९ जुलै रोजी सुनावणी घेण्याचा निश्चित केले. व्यापम घोटाळ्या संदर्भात दाखल करण्यात आलेल्या सर्वच याचिकांवर सुनावणी घेण्यात येणार आहे.
व्यापम घोटाळ्यातील कथित संबंधांमुळे राम नरेश यादव यांना पदावरून दूर करण्यात यावे, तसेच या प्रकरणात त्यांची चौकशी करण्यात यावी, अशी मागणी करणारी याचिका काही वकिलांनी सर्वोच्च न्यायालयात दाखल केली आहे. व्यापम घोटाळ्याचा तपास करण्यासाठी नेमण्यात आलेल्या विशेष तपास पथकाला चार महिन्यांचा जादा कालावधी सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे.