केरळमधील मच्छिमारांच्या हत्येप्रकरणातील आरोपी इटलीतील नाविक सॅल्वाटोर गिरोन याच्या जामिनाच्या अटींमध्ये सुधारणा करीत सर्वोच्च न्यायालायने गुरुवारी त्याला मायदेशी जाण्याला परवानगी दिली. हा खटला भारत की इटली यापैकी कुठे चालवायचा, याबाबतचा आंतरराष्ट्रीय लवादाचा निकाल येत नाही तोपर्यंत इटलीला जाण्यास गिरोन याला न्यायालयाने परवानगी दिली आहे. या खटल्यातील अन्य आरोपी मॅसिमिलानो लॅटोर आजारपणामुळे आधीपासूनच इटलीमध्ये आहे. सर्वोच्च न्यायालयाने त्याच्या जामीनाच्या कालावधीत ३० सप्टेंबरपर्यंत वाढ केली आहे.
न्यायमूर्ती पी. सी. पंत आणि न्या. डी. वाय. चंद्रचूड यांच्या खंडपीठाने इटलीच्या भारतातील राजदूतांकडून प्रतिज्ञापत्र मागवले असून, आंतरराष्ट्रीय लवादाने हा खटला भारतात चालविण्यास सांगितल्यावर आरोपींना एक महिन्याच्या आत भारतात आणण्याची जबाबदारी राजदूतांवर राहिल, असे प्रतिज्ञापत्रामध्ये नमूद करण्यास सांगितले आहे.
‘अनलॉफूल ऍक्टस अगेन्स्ट सेफ्टी ऑफ मारिटाइम नॅव्हिगेशन ऍंड फिक्स्ड प्लॅटफॉर्म ऑन कॉंटिनेंटल शेल्फ ऍक्ट, 2002’ मधील कलम ३ अ (१) नुसार कोणत्याही व्यक्तीने दुसऱया व्यक्तीची हत्या केल्यास त्याला फाशीची शिक्षा देण्याची तरतूद करण्यात आली आहे. आरोपी मॅसिमिलानो लॅटोर आणि सॅल्वाटोर गिरोन यांच्यावर आयपीसीतील कलम ३०२ खाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे.