चित्रपटगृहांमध्ये चित्रपट सुरु होण्यापूर्वी राष्ट्रगीत लावण्याचे आदेश सुप्रीम कोर्टाने दिले असले तरी दुसरीकडे सुप्रीम कोर्टानेच न्यायालयात कामकाज सुरु होण्यापूर्वी राष्ट्रगीत लावण्याची मागणी फेटाळून लावली आहे. राष्ट्रगीताविषयीचे आदेश आता आणखी ताणू नका असे कोर्टाने म्हटले आहे.

एका वकिलाने राष्ट्रगीतासंदर्भात सुप्रीम कोर्टात याचिका दाखल केली होती. देशभरातील न्यायालयांमध्ये दिवसाचे कामकाज सुरु होण्यापूर्वी राष्ट्रगीत लावावे अशी मागणी याचिकाकर्ता वकिलाने केली होती. शुक्रवारी सुप्रीम कोर्टात याचिकेवर सुनावणी झाली. या सुनावणीत कोर्टाने ही याचिकाच फेटाळून लावली. राष्ट्रगीतासंदर्भात दिलेले आदेश आता आणखी खेचू नका असेही कोर्टाने याचिकाकर्त्यांना सांगितले. याचिकाकर्त्याने या संदर्भात योग्य पद्धतीने याचिका दाखल करावी असे कोर्टाने नमूद केले. तसेच यासंदर्भात अॅटर्नी जनरल यांचेही मत घेतले जाईल असे कोर्टाच्या आदेशात म्हटले आहे.

देशभरातील सर्व चित्रपटगृहांमध्ये चित्रपट सुरू होण्यापूर्वी राष्ट्रगीत लावण्यात यावे, असे आदेश सुप्रीम कोर्टाने दोन दिवसांपूर्वी दिले होते. राष्ट्रगीत सुरू असताना चित्रपटाच्या पडद्यावर राष्ट्रध्वजाचे छायाचित्रही दाखवावे. तसेच राष्ट्रगीत सुरू झाल्यानंतर चित्रपटगृहातील प्रत्येकाने राष्ट्रगीताच्या सन्मानार्थ उभे राहिलेच पाहिजे, असेही कोर्टाने स्पष्ट केले होते. व्यावसायिक कारणासाठी राष्ट्रगीतात कोणतेही फेरफार किंवा ते संक्षिप्त केले जाऊ नये असेही कोर्टाने स्पष्ट केले होते. केंद्र सरकारकडून लवकरच यासंबंधीच्या आदेशांची प्रत सर्व राज्यांना पाठविली जाणार आहे. सुप्रीम कोर्टाच्या या आदेशावरुन वादही निर्माण झाला होता.