बँकांचे हजारो कोटींचे कर्ज बुडवून परदेशात जाऊन बसलेले उद्योगपती विजय मल्ल्या यांना सुप्रीम कोर्टाने त्यांच्या संपत्तीची संपूर्ण माहिती बँकांना सुपूर्द करण्याचे आदेश दिले आहेत. विजय मल्ल्या भारतात येण्यास आणि न्यायालयासमोर उपस्थित राहण्यास इच्छुक नसल्याचे म्हणत सुप्रीम कोर्टाने मल्ल्या यांना फटकारले. विजय मल्ल्या यांनी त्यांच्या आणि कुटुबियांच्या नावावर असलेली देशाविदेशातील संपत्तीची संपूर्ण माहिती एका बंद पाकिटातून बँकांना देण्यास सांगितले. यासोबत संपत्तीच्या माहितीच्या आधारे बँकांनी काय कारवाई केली याची माहिती दोन महिन्यात देण्याचे आदेशही सुप्रीम कोर्टाने दिले आहेत.
संपत्ती जाहीर झाल्यानंतर बँका कायद्याप्रमाणे कारवाई करतील असेही कोर्टने सांगितले आहे. विजय मल्ल्या फरार आहेत, त्यांनी न्यायालयात यावे. तसेच संपत्तीची माहिती दिल्यास मध्यस्थी करण्यास प्रोत्साहन मिळेल अशी बाजू बँकांनी न्यायालयात मांडली आहे.
दरम्यान, विजय मल्ल्या यांच्याकडून फक्त कर्जवसुली न करता त्यांना कारागृहात टाकण्याचा बँकांचा उद्देश असल्याचा दावा मल्ल्यांच्या वकिलाने केला आहे. मल्ल्या यांच्याविरोधात जाणूनबुजून अशी परिस्थिती उभी केली जात आहे. अशा परिस्थितीत भारतात परत येणे मल्ल्यांसाठी कठीण असल्याचेही त्यांचे वकील म्हणाले.