तामिळनाडूतील लोकगायक शिवराज ऊर्फ कॉमरेड कोवन याला देण्यात आलेली पोलिस कोठडी रद्द करण्याच्या उच्च न्यायालयाच्या निर्णयाविरोधात तामिळनाडू सरकारने दाखल केलेली आव्हान याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली आहे. कोवन याच्यावर मुख्यमंत्री जयललिता यांच्यावर टीका केल्याने राजद्रोहाचा आरोप करण्यात आला होता. सर्वोच्च न्यायालयाने सोमवारी हा निकाल दिला.
न्या.एफएमआय कलिफुल्ला व उदय ललित यांनी सांगितले, की कोवन याला पोलिस कोठडी देण्याच्या सरकारच्या निर्णयात काही तथ्य नाही कोवन याच्यावर राजद्रोहाचा आरोप ठेवल्यानंतर गेले काही आठवडे तामिळनाडूतील विरोधी पक्षांचे नेते व कार्यकर्ते यांनी या निर्णयावर टीका केली होती. दारूविरोधी प्रचार करणाऱ्या गायकावर राजद्राहोचा गुन्हा दाखल करणे म्हणजे लोकशाहीचा खून आहे, देशात असहिष्णुता वाढत असल्याचेच हे उदाहरण आहे, अशी टीका करण्यात आली. ५४ वर्षांचा कोवन हा डाव्या विचारसरणीच्या मक्कल कलाई इलकिया कझगम या संघटनेचा प्रमुख प्रमुख गायक असून त्याला जयललिता यांच्याविरोधात एका खेडय़ातील कार्यक्रमात आक्षेपार्ह विधान करणे व तसाच आक्षेपार्ह आशय समाज माध्यमांवर टाकणे या घटनानंतर ऑक्टोबरमध्ये त्रिची येथे त्याला सार्वजनिक शांततेचा भंग केल्याच्या आरोपाखाली अटक करण्यात आली होती. कोवनला स्थानिक न्यायालयाने दोन दिवस पोलिस कोठडी देण्याचा दिलेला निकाल चुकीचा होता, असे सांगून मद्रास उच्च न्यायालयाने त्या निर्णयाला सात नोव्हेंबर रोजी स्थगिती दिली होती. त्यावर तामिळनाडू सरकारने सर्वोच्च न्यायालयात या निर्णयाला आव्हान दिले होते. या गायकाने तामिळनाडू सरकारच्या दारू विक्री धोरणावर टीका केली होती पण त्यात जयललिता यांच्यावर व्यक्तिगत टीका केली होती. त्याचे नक्षलवाद्यांशी संबंध असावेत याचा तपास करण्यासाठी त्याला दोन दिवस पोलिस कोठडी देण्याचा निकाल कनिष्ठ न्यायालयाने दिला होता.