देशभरातील सर्व चित्रपटगृहांमध्ये चित्रपट सुरू होण्यापूर्वी राष्ट्रगीत लावण्यात यावे, असे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत. राष्ट्रगीत सुरू असताना चित्रपटाच्या पडद्यावर राष्ट्रध्वजाचे छायाचित्रही दाखवावे, असेही न्यायालयाने स्पष्ट केले आहे. तसेच राष्ट्रगीत सुरू झाल्यानंतर चित्रपटगृहातील प्रत्येकाने राष्ट्रगीताच्या सन्मानार्थ उभे राहिलेच पाहिजे, असेही न्यायालयाकडून सांगण्यात आले. केंद्र सरकारकडून लवकरच यासंबंधीच्या आदेशांची प्रत सर्व राज्यांना पाठविली जाणार आहे. तसेच व्यवसायिक कारणासाठी राष्ट्रगीतात कोणतेही फेरफार किंवा ते संक्षिप्त केले जाऊ नये, असेही यावेळी न्यायालयाने सांगितले. विशेषत: जाहिरातींमध्ये राष्ट्रगीताच्या अन्य स्वरूपाचा वापर करू नये, असे न्यायालयाने म्हटले. याशिवाय, आक्षेपार्ह वस्तुंवर राष्ट्रगीत छापले किंवा दाखवले जाऊ नये, असे स्पष्ट आदेश न्यायालयाने दिले.

चित्रपटाआधी राष्ट्रगीत पडद्यावरून सादर केले जात असताना उभे राहावे की नाही, याची निश्चित नियमावली नसल्यामुळे चित्रपटगृहात अनेकदा वादाचे प्रसंग उद्भवल्याचे समोर आले आहे. मात्र, आता सर्वोच्च न्यायालयाने याबाबतचे धोरण स्पष्ट केले आहे. आतापर्यंत केवळ महाराष्ट्रातच चित्रपट सुरू होण्यापूर्वी चित्रपटगृहात राष्ट्रगीत वाजवणे बंधनकारक होते. मात्र, आता संपूर्ण देशभरातील चित्रपटगृहांसाठी हा नियम लागू करण्यात आला आहे.  राष्ट्रगीत, तेदेखील चित्रपटाच्या पडद्यावर, सुरू असताना उभे राहायला हवे असा कोणताही कायदा वा नियम नाही. राष्ट्रसन्मानाची प्रतीके सांभाळावीत कशी, त्यांचा आदर कसा करावा हे स्पष्ट करणाऱ्या प्रिव्हेंशन ऑफ इन्सल्ट्स टू नॅशनल ऑनर अ‍ॅक्ट १९७१ या कायद्यात अशा कोणत्याही नियमाचा उल्लेख नाही. राष्ट्रगीत म्हणू पाहणाऱ्यास रोखण्याचा प्रयत्न झाला तर मात्र तो राष्ट्रचिन्हाचा, राष्ट्रगीताचा अपमान ठरतो आणि तो करणाऱ्यास तुरुंगवास घडू शकतो. त्याचप्रमाणे एखाद्या समारंभात राष्ट्रगीत प्रत्यक्ष गायले जात असेल आणि उपस्थितांनी उभे राहून मानवंदना दिली नाही तर देखील तो राष्ट्रगीताचा अपमान ठरतो. परंतु हा नियम चित्रपटाच्या पडद्यावर अप्रत्यक्षपणे वाजविल्या जाणाऱ्या राष्ट्रगीतप्रसंगी लागू होत नाही. त्यामुळे चित्रपटगृहात राष्ट्रगीत सुरू असताना उभे राहवे किंवा न राहवे याबाबत संभ्रमाचे वातावरण होते.